माहिम : यंदाची विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्रासाठी खूप महत्वाची असणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने उद्धव ठाकरेंसाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची असणार आहे. त्यातल्या त्यात दादर-माहीम मतदारसंघ ठाकरेंसाठी खूप महत्वाचा असणार आहे.
माहिममध्ये होणार तिहेरी लढत
या मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील झालेले सदा सरवणकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.तर, दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघातून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
कोण आहेत महेश सावंत?
महेश सावंत प्रभादेवीमधील जुने शिवसैनिक आहेत. महेश सावंत यांनी 1990 पासून शिवसेनेत सक्रियपणे काम करण्यास सुरुवात केली. सध्या शिंदे गटात असलेले आमदार सदा सरवणकर यांची प्रभादेवी भागावर पकड होती. महेश सावंत हे सदा सरवणकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. मात्र, वर्ष 2009 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आदेश बांदेकरांना उमेदवारी जाहीर केली आणि सदा सरवणकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.
नारायण राणे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत सरवणकरही जाणार होते अशी चर्चा होती. पण 2009 च्या विधानसभा निवडणुकीत सरवणकर यांनी काँग्रेसचा हात पकडला. सदा सरवणकर यांच्यासोबत जी मोजकी मंडळी गेली त्यात महेश सावंत यांचाही समावेश होता. काही वर्षांनी सदा सरवणकर पुन्हा शिवसेनेत आले तेव्हा महेश सावंत देखील शिवसेनेत परतले.
सरवणकरांसोबत वाद
सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यात 2017 च्या सुमारास वितुष्ट निर्माण झाले. पक्षासाठी काम करूनही महापालिका निवडणुकीत डावलण्यात येत असल्याची सल सावंत यांच्या मनात होती. 2017 मधील मुंबई महापालिका निवडणुकीत सदा सरवणकर यांनी आपला मुलगा समाधान सरवणकर याची उमेदवारी पक्षाकडून मिळवली. त्यानंतर महेश सावंत यांनी बंड पुकारत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि याच निवडणुकीपासून त्यांच्यात वाद निर्माण झाला.