खडकवासलात कौल कोणाला?

वडगाव बुद्रुक, धायरी, उत्तमनगर, शिवणे आणि धायरी भागात मतदान वाढले

पुणे – खडकवासला विधानसभा मतदारसंघात 4 लाख 86 हजार 948 मतदारांपैकी केवळ 2 लाख 50 हजार 71 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. म्हणजेच यावेळी 51.35 टक्के मतदान झाले असून, वडगाव बुद्रुक, नऱ्हे, धायरी, उत्तमनगर, शिवणे, जांभळी या भागात सर्वाधिक मतदान झाले आहे. त्यामुळे हे मतदान कोणाला विजयी करणारे आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

खडकवासला मतदारसंघात 2014 मध्ये 54.92 टक्के मतदान झाले होते. यावेळी महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार दिलीप बराटे यांचा 63 हजार मतांनी पराभव केला. मात्र, यावर्षी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नवीन चेहऱ्याला संधी देण्यात आली. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीचा होणार हे निश्‍चित झाले होते. खडकवासल्यात महायुती आणि आघाडी हीच प्रमुख लढत पाहण्यास मिळणार असल्यामुळे दोन्ही उमेदवारांकडून मतदारसंघ पिंजून काढण्यात आला. सोमवारी (दि. 21) मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आणि मतदानाची टक्केवारी पाहता अनेक ठिकाणी मतदान कमी-अधिक प्रमाणात झाल्याचे दिसून येते.

बालेकिल्ल्यातच टक्‍का घटला
प्रामुख्याने महायुती आणि आघाडीच्या दोन्ही उमेदवारांच्या बालेकिल्ल्यातच मतदानाची टक्केवारी कमी आहे. धायरी आणि वारजे परिसरात साधारण 45 ते 56 टक्के मतदान झाले.

तर वडगाव बुद्रुक, धायरी, उत्तमनगर, शिवणे, जांभळी, आंबी, नऱ्हे, शिवापूर, कोंढणपूर या ठिकाणी 60 टक्‍क्‍यांच्यावर मतदान झाले आहे. मात्र, हे मतदान कोणाच्या पदरात पडणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, सर्वांत कमी मतदान बहुली, वारजे येथील बराटे शाळा, भुसारी कॉलनी, बिबवेवाडी, कात्रज, मालखेड आणि धनकवडीतील काही भागात झाले. याठिकाणी केवळ 31 ते 40 टक्के मतदान झाले. तर सर्वात जास्त नऱ्हे परिसरात 78 टक्के मतदान झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.