जयंतराव कि अजितदादा उपमुख्यमंत्री कोण? संजय राऊत म्हणाले….

मुंबई – महाराष्ट्राचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून तसेच ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज शपथ घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांचा शपथविधी आज सायंकाळी होत असून त्यांच्यासोबत तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन मंत्री शपथ घेणार आहेत. या सरकारमध्ये केवळ एकच उपमुख्यमंत्रिपद राहणार असून ते राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असणार आहे. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील कि अजित पवार यापैकी कोण उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हे अजून स्पष्ट नाही. तर तो राष्ट्रवादीचा अंतर्गत मुद्दा असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.

संजय राऊत म्हणाले कि, महाराष्ट्रासाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. कारण तब्बल 20 वर्षांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होतो आहे. तसेच नवे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री जयंत पाटील कि अजित पवार याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले कि, मला माहित नाही, ही राष्ट्रवादीची अंतर्गत बाब आहे. शरद पवार हे ‘महाविकास आघाडी’ (शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी) चे ज्येष्ठ नेते आहेत. अजितदादांना किंवा त्यांच्या पक्षातील अन्य कोणत्या नेत्यास ते पद द्यावे याचा निर्णय शरद पवार घेतील, असे त्यांनी म्हंटले.

नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांना मंत्रिमंडळात जागा मिळणार का? यावर ते म्हणाले, मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करणे किंवा नाही हा निर्णय पूर्णतः मुख्यमंत्र्यांचा असेल. उद्धव ठाकरे आता त्यांचे वडीलच नाहीत तर मुख्यमंत्रीही आहेत, ते निर्णय घेतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.