रांची : झामुमोचे नेते हेमंत सोरेन यांनी रविवारी झारखंडचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सोरेन दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. हेमंत सोरेन यांनी वयाच्या 38 व्या वर्षी प्रथमच 13 जुलै 2013 रोजी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. 10 ऑगस्ट 1975 रोजी जन्मलेल्या सोरेन हे माजी केंद्रीय मंत्री आणि झारखंडचे तीन वेळा मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे पुत्र आहेत. शिबू सोरेन यांनी तीन वेळा राज्यातील सत्ता हाती घेतली पण त्यांना एकदाही सरकार चालवता आले नाही.
हेमंत यांनी बीआयटीमध्ये अभियांत्रिकीला प्रवेश घेतला होता पण त्यांचे शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही. 24 जून, 2009 ते 4 जानेवारी 2010 पर्यंत ते झारखंडमधील राज्यसभेचे सदस्य होते. सप्टेंबर 2010 मध्ये तयार झालेल्या अर्जुन मुंडा सरकारमध्ये हेमंत यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला होता. उपमुख्यमंत्र्यांसमवेत त्यांनी अर्थ मंत्रालयाचीही जबाबदारी सांभाळली. विरोधी पक्षनेते म्हणून हेमंत सोरेन डिसेंबर 2014 पासून सार्वजनिक विषयांवर विधानसभेत आवाज उठवत आहेत. आदिवासींच्या जमीन, जंगलाबद्दल त्यांनी भूसंपादन कायद्यात सुधारणा करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला त्यांनी तीव्र विरोध केला आहे.
हेमंत यांनी 2014 मध्ये निवडणूक लढवून स्वबळावर झामुमोला 19 जागा जिंकून दिल्या होत्या. 2009 च्या निवडणुकीत जेएमएमने त्यांच्या वडिलांच्या नेतृत्वात केवळ 18 जागा जिंकल्या होत्या. यावेळी, लोकसभा निवडणुकीपूर्वी हेमंत यांनी महाआघाडी केली आणि राज्यातील मोठा पक्ष असूनही कॉंग्रेसला अधिक जागा लढविण्याची मुभा दिली.
30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या काळात झारखंडमध्ये झालेल्या पाच-टप्प्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वात विरोधी पक्षातील झामुमो-कॉंग्रेस-आरजेडी आघाडीने 81-सदस्यांच्या विधानसभेत 47 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले.
या निवडणूकीत सत्ताधारी भाजपला केवळ 25 जागा मिळाल्या, तर 2014 मध्ये त्यांनी 37 जागा जिंकल्या आणि सहयोगी एजेएसयूला पाच जागा मिळाल्या होत्या. 23 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल आल्यानंतर राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन हेमंत सोरेन यांनी 24 डिसेंबर रोजी सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. 25 डिसेंबर रोजी राज्यपालांनी त्यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नामांकित केले आणि 29 डिसेंबरला शपथ घेण्याचे आमंत्रण दिले.