काटेवाडी, (वार्ताहर) – सहा महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे ह्या उमेदवार म्हणून निवडणूक साठी उभ्या राहिल्या असता. त्यावेळी नेत्यांनी भाषणामध्ये म्हणाले होते की, शरद पवार साहेब येतील, भावनिक होतील, डोळ्यात पाणी आणतील; परंतु तुम्ही भावनिक होऊ नका भावनिकतेला बळी पडू नका असे सांगितले गेले.
परंतु काल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या विधानसभेचे बारामती तालुक्याचे उमेदवार उपमुख्यमंत्री अजित पवार हे भावना विवश होऊन अजित पवार यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आले.
मात्र लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे अजित पवार बोलून गेले त्याला उत्तर म्हणून शरद पवार यांनी भावनाविवश कोण होत आहे हे सांगत आपल्या डोळ्यावरील चष्मा काढून डोळे पुसत अजित पवार यांचे नाव न घेता त्यांची नक्कल केली. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला व उपस्थितांनी जोर जोरात शरद पवारांच्या नावाने घोषणा दिल्या.
विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त बारामतीत शरद पवार बोलत होते. पवार म्हणाले, पंतप्रधान मोदींचे सरकार आले. राज्यातील कारखाने गुजरातला नेले. त्यामुळे अनेक नागरिकांच्या तरुणांच्या हातचे काम गेले. वेदांत कंपनीचा कारखाना तो गुजरातला नेला त्यामुळे चांगल्या लोकांना या कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही.
पंतप्रधान हे कोणत्या राज्याचे नसून संपूर्ण देशाचे आहेत त्यांनी कोणत्या राज्याचा विचार न करता देशाचा विचार केला पाहिजे, परंतु तसे होत नाही त्यामुळेच महाराष्ट्र राज्य हे पहिल्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर सध्या गेले आहे याची खंत वाटत आहे.
बारामतीचा विकास केला असे बोलले जात आहे; परंतु 1972 सालामध्ये विद्या प्रतिष्ठान ही शिक्षण संस्था आणली त्यावेळी अनेक कारखाने देखील आणले. बारामती मॉडेल म्हणूनच ओळखले जात होते. त्यावेळी कोण होते हा विकास कोणी केला, याचाही विचार जनतेने केला पाहिजे असे मत शरद पवारांनी व्यक्त केले.