Baba Siddique | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. वांद्रे परिसरातील खेरवाडी परिसरात त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. काही महिन्यांपूर्वीच बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला होता.
कोण होते बाबा सिद्दीकी?
बाबा झियाउद्दीन सिद्दीकी हे महाराष्ट्रातील वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. मुंबई काँग्रेसचा प्रमुख अल्पसंख्याक चेहरा असलेल्या सिद्दीकी यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असताना मंत्री म्हणूनही काम केले होते. त्यांनी सलग दोन वेळा (1992-1997) महापालिकेचे नगरसेवक म्हणूनही काम पाहिले आहे.
बाबा सिद्दीकी हे 1999, 2004 आणि 2009 मध्ये सलग तीन वेळा आमदार होते. ते अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्रीही होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.
राजकीय कारकीर्द Baba Siddique |
काँग्रेस सोडण्यापूर्वी ते मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष आणि वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. सुरुवातीच्या काळात ते विद्यार्थी चळवळीत होते. 1980 मध्ये त्यांना वांद्रे युवक काँग्रेसचे सरचिटणीस बनवण्यात आले आणि चार वर्षांनी ते अध्यक्ष झाले. 1988 मध्ये ते मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. तब्बल 48 वर्ष त्यांनी काँग्रेसमध्ये काम केले ज्यानंतर ते राष्ट्रवादी अजित पवार गटात दाखल झाले होते.
बॉलिवूडमध्येही दबदबा Baba Siddique |
बाबा सिद्दीकी हे नाव जितके राजकारणात लोकप्रिय होते तितकेच ते बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध होते. बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला बॉलिवूडमधील आघाडीच्या खान मंडळींसह सर्व अभिनेते, अभिनेत्री हजेरी लावायचे. केवळ राजकीय व्यक्तीच नाही तर बॉलिवूडचे बडे स्टार्सही त्यांच्या पार्ट्यांना हजेरी लावू लागले. या इफ्तार पार्ट्यांमध्ये सलमान-शाहरुख खानपासून अनेक दिग्गज दिसायचे. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर बॉलीवूडचे सलमान खान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीसह अनेक कलाकार मंडळी लीलावती रुग्णालयात रात्री आले होते.
हेही वाचा:
मोठी अपडेट…! बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग असल्याचा दावा