पुणे : भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काॅंग्रेस महायुती सरकारचा मंत्रिमंडळ शपथविधी सोहळा गुरुवारी होत आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातून मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे लक्ष लागले आहे. अजित पवार हे पुन्हा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तसेच भाजपकडून कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काॉंग्रेसकडून दिलीप वळसे पाटील हे मंत्रिपदाची शपथ घेण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
याचसह भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल, पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ, इंदापूरचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे, भोसरी येथील आमदार महेश लांडगे हे मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात 21 पैकी 18 जागांवर महायुतीला यश मिळाले आहे. तर, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीचे 19 आमदार झाले आहेत. या यशामुळे जिल्ह्यात पाच ते सहा मंत्रिपदे मिळू शकतात, अशी चर्चा आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
जिल्ह्यातून माधुरी मिसाळ या चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यामुळे त्या मंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. याचसह आमदार भीमराव तापकीर यांनीही मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावली आहे. तर, दौंडचे आमदार राहुल कुल यांना प्रचाराच्या वेळीच वरिष्ठांनी मंत्रिपदाचा शब्द दिला असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात. त्यामुळे कुल यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. याचसह पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरातील एकमेव आमदार चेतन तुपे यांनाही मंत्रिपदाची संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे.