मुंबई : तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठी भाषेच्या मुद्द्यावर एका व्यासपीठावर एकत्र आले, आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नवं पर्व सुरू झालं. वरळी डोम येथील विजयी जल्लोष मेळाव्यात शिवसेना (UBT) आणि मनसे यांनी एकत्र येत फडणवीस सरकारवर भाषिक धोरणावरून जोरदार टीकास्त्र सोडलं.
या मेळाव्यात सुप्रिया सुळेंनी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांना एकत्र आणत कुटुंबीयांची एकी दाखवली. पण या युतीमुळे “उरलीसुरली शिवसेना हायजॅक होईल का?” आणि याचा फायदा नेमका कुणाला होईल, यावर राजकीय विश्लेषकांनी ठोकताळे मांडले आहेत.
मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधात आयोजित या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांना मिठी मारत भावनिक क्षण साकारला. राज ठाकरे यांनी मुद्देसूद पण संयमित भाषणातून फडणवीस सरकारवर निशाणा साधला, तर उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर थेट हल्लाबोल केला. या मेळाव्याने शिवसेना (UBT) आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चांना बळ मिळालं आहे. मात्र, काँग्रेसच्या अनुपस्थितीमुळे आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट)च्या अस्पष्ट भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
महाविकास आघाडीत बिघाडी?
राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांनी या मेळाव्यावर भाष्य करताना सांगितलं की, काँग्रेसने मेळाव्याकडे पाठ फिरवून महाविकास आघाडीत बिघाडीचे संकेत दिले आहेत. “काँग्रेसने काढता पाय घेतला आहे. आघाडी आता विखुरेल,” असं त्यांचं मत आहे.
त्यांनी पुढे सांगितलं की, मराठवाडा आणि विदर्भात मनसेचं अस्तित्व नगण्य आहे, पण ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मनसेला या भागात बळ मिळेल, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाची पिछेहाट होईल. “जय गुजरातच्या मुद्द्याचा परिणाम शिंदे गटावर होईल,” असंही ते म्हणाले.
राज ठाकरेंचं महत्त्व वाढण्यासाठी भाजपची खेळी
तसेच संजय वरकड यांनी एक वेगळी शक्यता मांडली. त्यांच्या मते, “उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत तडजोड केली, पण राज ठाकरे तसं करणार नाहीत. ही युती ठाकरे कुटुंबीयांचं आणि विशेषतः आदित्य व अमित ठाकरेंचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आहे.” त्यांनी असा दावा केला की, भाजपने राज ठाकरेंचं महत्त्व वाढवण्यासाठी ही खेळी खेळली असावी, ज्यामुळे उद्धव ठाकरेंचं राजकीय वजन कमी होऊ शकतं.
मनसेला बळ, सेनेला मरगळीतून बाहेर?
संजीव उन्हाळे यांनी सांगितलं की, या युतीमुळे मनसेला मराठवाडा आणि विदर्भात नवं बळ मिळेल, तर शिवसेना (UBT) ला मरगळ झटकून नव्या जोमाने कामाला लागावं लागेल. आदित्य ठाकरे यांनी मराठवाड्यात खेडोपाडी प्रवास करून नेतृत्व सिद्ध केलं आहे, तर अमित ठाकरे आपलं अस्तित्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. “मराठवाडा आणि विदर्भात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. जो पक्ष यावर काम करेल, त्याला फायदा होईल,” असं त्यांनी नमूद केलं.
आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह
मेळाव्यात काँग्रेसच्या नेत्यांनी दांडी मारल्याने आघाडीतील तणाव स्पष्ट झाला. राष्ट्रवादी (शरद पवार गट) ची भूमिका अद्याप अस्पष्ट आहे, पण सुप्रिया सुळेंनी आदित्य आणि अमित यांना एकत्र आणत युतीच्या शक्यतांना बळ दिलं. विश्लेषकांच्या मते, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, आणि छत्रपती संभाजीनगरसारख्या महापालिकांमध्ये काँग्रेसचं अस्तित्व कमी आहे, त्यामुळे आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह आहे.