रस्ते खोदाई कोणी केली?, आम्ही नाही पाहिली!

अधिकारी म्हणतात, “चौकशी करतो’

याबाबत पथविभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्याकडेही विचारणा करण्यात आली; परंतु “चौकशी करतो’ असे उत्तर त्यांच्याकडून आले. त्यानंतर गेल्या आठ दिवसापासून पाइप टाकून बुजविलेला राडारोडा तेथेच जागेवर पडून होता. या कामासंदर्भात पावसकर यांच्याकडे पुन्हा शुक्रवारी (17 मे) विचारणा केली असता, त्यांनी कार्यालयातील एका अधिकाऱ्याला चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर केवळ पाइपलाइन केलेल्या ठिकाणाहून राडारोडा उचलण्यात आला. आता रस्ता पूर्ववतही होईल; परंतु खोदाईस परवानगी देण्यात आली होती का, किंवा संबंधित जागेवर पाइपलाइन कोणी आणि कशासाठी टाकली, याचा थांगपत्ता अद्याप लागला नाही. एवढेच नव्हे, तर कारवाई करण्याच्या आदेशाचा विसर पथ विभागालाच पडल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

पुणे – महापालिका हद्दीतील रस्ते किंवा पथपथांवर खोदाई करण्याला बंदी असतानाही अतिशय धीटपणे सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी येथे पदपथ खोदून खासगी पाइपलाइन टाकण्यात आली आहे. 10 मे पासून सुरू असलेल्या या कामाचा महापालिकेला मात्र पत्ता नाही किंवा खबरही दिली नाही. याबाबत महापालिकेच्या पथ विभागाकडे गेल्या आठ दिवसांपासून चौकशी केली असता; आठही दिवस “माहिती घेतो’ एवढे एकच उत्तर दिले जात आहे. कोण खोदाई करत आहे, याचा पत्ता महापालिकेला आठ दिवस शोध घेऊनही लागत नाही, ही बाब न समजणारी आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्याच संगनमताने हा प्रकार सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

महापालिकेच्या उत्पन्नाचा एक भाग म्हणून शहरात विविध कंपन्यांच्या सेवा वाहिन्या टाकण्यासाठी महापालिकेच्या पथ विभागाकडून शुल्क आकारून परवानगी दिली जाते. त्याशिवाय इतर काही खासगी कामासाठीही सशुल्क परवानगी दिली जाते. ही परवानगी ऑक्‍टोबर ते एप्रिल या कालावधीतच दिली जाते. पाऊस सुरू झाल्यानंतर नागरिकांना आणि वाहनचालकांना खोदाई आणि राडारोड्याचा त्रास होऊ नये, यासाठी परवावानगी घेतलेल्या सर्व कंपन्यांनी 30 एप्रिलपर्यंत खोदाई पूर्ण करून राडारोडा उचलून रस्ते पूर्ववत करावे, असे आदेश पथ विभागाने दिले आहेत.

कोणत्याही परिस्थितीमध्ये 30 एप्रिल नंतर शहरात कुठेही खोदाईची कामे सुरू असल्याचे आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा प्रशासनातर्फे दरवर्षीच दिला जातो.असे असतानाही 10 मे रोजी सिंहगड रस्ता परिसरातील विठ्ठलवाडी येथे दोनशे ते अडीचशे मीटर लांबीचा पदपथ आणि विठ्ठलमंदिराकडे जाणारा रस्ता खोदून खासगी पाइपलाइन टाकण्यात आली. यासंदर्भात काम करणाऱ्यांकडे चौकशी केल्यानंतर स्थानिक नगरसेविकेच्या निधीतून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भातील फोटो दाखवल्यानंतर टाकण्यात येणारे पाइप महापालिकेचे नाहीत, तर ते खासगी असल्याचे महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.