“कोण आला रे कोण आला…बंजाऱ्यांचा वाघ आला”;संजय राठोड यांच्या समर्थकांचे शक्तीप्रदर्शन

मुंबई : पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने राज्यातील राजकारणात एकच गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान आरोपांवर संजय राठोड हे चक्क १५ दिवसांनी सर्वांसमोर आले असून पोहरादेवीला दाखल झाले आहेत. दरम्यान, यावेळी त्यांच्या समर्थकांनी पोहरादेवी परिसरात जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी त्यांनी “कोण आला रे कोण आला…बंजाऱ्यांचा वाघ आला” अशा घोषणा देखील दिल्या.

समर्थकांनी शक्तीप्रदर्शना दरम्यान राज्यावर घोंघावणाऱ्या करोना संकटाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून आले. इतकंच काय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनालाही संजय राठोड आणि समर्थकांनी पायदळी तुडवत पोहरादेवी परिसरातील प्रचंड गर्दी केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या समर्थकांकडून शक्तीप्रदर्शन करताना “कोण आला रे कोण आला…बंजाऱ्यांचा वाघ आला” अशा घोषणाही दिल्या जात आहेत.

पूजा चव्हाण प्रकरण चर्चेत आल्यापासूनच संजय राठोड अज्ञातवासात गेले होते. एका ऑडिओ क्लिपमुळे संजय राठोड यांचं नाव चर्चेत आलं होतं. यानंतर भाजपाने जाहीरपणे संजय राठोड यांच्याविरोधात कारवाईची मागणी सुरु केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच संजय राठोड सर्वांसमोर आले असून पोहरादेवीत दाखल झाले. यावेळी त्यांनी जगदंबा देवी तसंच सेवालाल महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. मात्र यावेळी त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणावर कोणतेही भाष्य केलेलं नसून मौन कायम ठेवले आहे.

दरम्यान राज्यात करोना रुग्ण वाढत असल्याने एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणली असताना दुसरीकडे संजय राठोड यांच्या समर्थकांनी तुफान गर्दी केली आहे. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जदेखील करावा लागला. मात्र गर्दी कमी होत नसून यावेळी संजय राठोड यांना पाठिंबा दाखवण्यासाठी घोषणा दिल्या जात आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.