अकोला : दोन वर्षांपूर्वी आम्ही उठाव केला. या राज्यामध्ये संघर्ष झाला. सर्वसामान्य माणसांच्या मनातले सरकार एकनाथ शिंदेंने आणून दाखवले. महाराष्ट्राच्या जनतेने भाजप-शिवसेनेला मतदान केले. सरकारही भाजप-शिवसेनेचे यायला पाहिजे होते. मात्र जनतेशी गद्दारी कोणी केली?, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.
अकोल्याच्या बाळापूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर सडकून टीका केली, तसेच महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचेच सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये गेले दोन वर्ष आपण महायुती म्हणून काम करतोय. आपला विकासाचा अजेंडा आहे, अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. एकनाथ शिंदेंनी शब्द दिला की शब्द मागे घेत नाही. एक बार मैने कमिटमेंट करदी तो मैं खुद की भी नही सुनता,तशी बाळासाहेबांची शिकवण आहे.
शिवसेना चोरली, धनुष्यबाण चोरली म्हणता, लहान मुलांसारखं का रडता? तुम्ही झोपला होता का? धनुष्यबाण उचलायला मनगटात ताकद लागते. सत्ता सोडायला हिंमत लागते. सत्ता सोडण्याची हिंमत तुमच्या एकनाथ शिंदेंनी दाखवली. जिथे बाळासाहेबांचे विचार तोडले, मोडले जात होते, शिवसैनिक जेलमध्ये जात होते, खच्चीकरण होत होते. बाळासाहेबांचा धनुष्यबाण जो उबाठाने काँग्रेसकडे गहाण ठेवला होता, तो आम्ही सोडवला, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
अडीच वर्षात महाविकास आघाडीने अनेक प्रकल्प बंद पाडले. सगळ्या प्रकल्पात खोडा घातला, स्पीडब्रेकर लावले. पण आपले सरकार आल्यानंतर सगळे स्पीड ब्रेकर हटवले आणि कामाला चालना दिली. महाविकास आघाडीचे नेते लाडकी बहीण योजनेवर टीका करतात.
आमचे सरकार आल्यानंतर या योजनेची चौकशी करु, दोषींवर कारवाई करु म्हणतात. पण लाडक्या बहिणींसाठी जेलमध्ये जायची वेळ आली तर हा एकनाथ शिंदे एकदा नव्हे १० वेळा तुरुंगात जाईल, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.