नवी दिल्ली – जगभरात थैमान घातल्यानंतर आता भारतात करोनाने धुमाकूळ लावला आहे. करोनापासून वाचण्यासाठी प्रत्येकजण धडपडत आहे. मात्र राजधानी दिल्लीतील एका व्यक्तीला एकादाच नव्हे तर तब्बल चार वेळा करोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे चारही वेळा ही व्यक्ती करोनातून सहीसलामत बाहेर पडली आहे.
३७ वर्षीय योगेंद्र बैसोया यांना तब्बल चार वेळा झाला. पण यातून खचून न जाता त्यांनी इतर रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी दोनवेळा प्लाझ्मा दान केला आहे. योगेंद्र बैसोया हे दक्षिण दिल्ली येथील कोटला मुबारकपूर, खैरपूर गावचे राहीवाशी आहेत.
योगेंद्र यांना जेव्हा दुसऱ्यांदा करोना झाला तेव्हा त्यांचे कुटुंबही करोनाच्या कचाट्यात सापडले होते. तर योगेंद्र यांना ऑक्सिजन लावावा लागले होता. त्यातही त्यांनी हार मानली नाही. जेव्हा चौथ्यांदा करोना झाला तेव्हा त्यांनी दृढ निश्चय केला की, ते कोणत्याही परिस्थितीत रुग्णालयात जाणार नाहीत आणि घरी राहून उपचार घेतील. योगेंद्र बैसोया यांनी तसेच केले आणि यावेळी ऑक्सिजनशिवाय करोनावर विजय मिळवला.
योगेंद्र आणि त्यांची पत्नी एका एमएनसी कंपनीमध्ये काम करतात. या कंपनीत योगेंद्र हे नेटवर्क सुरक्षा अभियंता म्हणून काम करतात. त्यांना गेल्या वर्षी जूनमध्ये पहिल्यांदा करोना झाला होता. यानंतर सप्टेंबरमध्ये पुन्हा त्यांना कोरोनाची लागण झाली. १४ दिवसानंतर जेव्हा त्यांनी आपली पुन्हा कोरोना चाचणी केली तेव्हा ती पॉझिटिव्ह आली. यानंतर सुमारे एका महिन्यानंतर ते बरे झाले होते. यानंतर तिसऱ्यांदा जानेवारीत आणि गेल्या महिन्यात चौथ्यांदा योगेंद्र करोनाला समोरे गेले.