‘ते’ आठ नगरसेवक कोण?

घसरलेल्या मताधिक्‍यावर काथ्याकुट चालूच

पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचे घटलेले मताधिक्‍य अद्यापही चर्चेचा विषय बनला आहे. घटलेल्या मताधिक्‍यला “ते’ आठ नगरसेवक कारणीभूत असल्याचा गोपनिय अहवाल निवडणुकीनंतर उघड झाला असून, नुकत्याच झालेल्या नगरसेवक आणि आमदारांच्या बैठकीतही हा मुद्दा चर्चेला आला होता. त्यामुळे “ते’ आठ नगरसेवक कोणते? यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात आयटी क्षेत्रातील तरुण मतदारांची संख्या सन 2011 नंतर मोठ्या प्रमाणात वाढली. सन 2014 साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आयटीत काम करणाऱ्या मतदारांनी नरेंद्र मोदी यांना आपले आयडॉल मानत मतदान केल्यामुळे चिंचवड हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला बनला. प्रत्येक निवडणुकीत या मतदारसंघात भाजपाचे मताधिक्‍य वाढले होते. विशेष म्हणजे भाजपाला मानणारा मतदार या मतदारसंघात पुन:र्वापर आहे. आरएसएसच्या कार्यकर्त्यांचे संख्याबळ तसेच ब्राम्हण समाजाची चिंचवड गावात असलेली मोठी संख्या यामुळे या मतदारसंघात पूर्वीपासूनच भाजपाला जनाधार होता. 2014 नंतर यामध्ये मोठी वाढ झाली होती.

एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत हा जनाधार कायम होता. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला राष्ट्रवादीपेक्षा सुमारे 98 हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत हेच मताधिक्‍य 38 हजारांपर्यंत घसरले. चिंचवड विधानसभेत दीड लाख मतांनी लक्ष्मण जगताप भाजपाच्या तिकीटावर विजयी होती, अशी अपेक्षा भाजपप्रेमींना होती. मात्र राहुल कलाटे यांनी भाजपाचा जनधार कमी करण्यात यश मिळविले होते.

घसरलेल्या जनाधाराला जबाबदार कोण? याची चर्चा मतमोजणीच्या दिवसापासून रंगली आहे. मात्र भाजपाने निवडणुकीच्या पूर्वी एक गोपनिय अहवाल तयार करून तो पक्षाच्या वरिष्ठांना तसेच उमेदवारांना दिला होता. मात्र या अहवालाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. हा अहवाल आता समोर आला आहे. या अहवालामध्ये “त्या’ आठ नगरसेवकासोबत उमेदवाराने फिरू नये, अन्यथा मताधिक्‍य घटेल, असे सांगण्यात आले होते. मात्र निवडणुकीत या अहवालाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच मताधिक्‍य घटल्याचे बोलले जात आहे. मात्र ते आठ नगरसेवक कोण? हे अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून राजकीय वर्तुळात हाच एकमेव विषय सध्या चर्चेचा बनला आहे.

राहुल कलाटेंची झुंज सुरूच…
भाजपाने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुल कलाटे यांचा पराभव केला असला तरी कलाटे यांनी भाजपाविरोधी भूमिका कायम ठेवत एकहाती लढा सुरू ठेवला आहे. पाणी, कचरा, पालिकेतील भ्रष्टाचार या मुद्यावर त्यांनी भाजपाला जेरीला आणण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता भाजपविरोधी मोहिमेत खासदार श्रीरंग बारणे यांनीही उडी घेतल्याने भाजपा विरोधाची धार अधिकच तीव्र होण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते मात्र भाजपविरोधापासून स्वत:ला अद्यापही दूरच ठेवत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.