पुणे – भारताचा तारणहार असलेला यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी हा या विश्वचषक स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळेच त्याचा वारसदार शोधण्यास वेग येणार आहे. सध्याच्या पर्यायांनुसार लोकेश राहुल, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक आदी नावे चर्चेत आहेत.
#CWC19 : विश्वचषकानंतर धोनी निवृत्त होणार?
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात एकाच वेळी धोनी याच्याबरोबर कार्तिक व पंत यांनाही अंतिम अकरा खेळाडूंमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती, त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या सामन्यात भारतास विजयाची आणि पर्यायाने उपांत्य फेरी गाठण्याची खात्री होती. त्यामुळेच धोनीला पर्याय शोधण्याची ही चांगली संधी आहे असा विचार भारताचा कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मनात आला असावा आणि त्यांनी हा विचार प्रत्यक्षात अंमलात आणलाही. त्यातच या स्पर्धेत वाढत्या वयानुसार धोनी याच्याकडे असलेले यष्टीरक्षण कौशल्य व आक्रमक फलंदाजी याबाबत मर्यादा अधिकच स्पष्ट झाल्या. हे लक्षात घेऊनच त्याला पर्याय शोधण्याची तातडीने गरज आहे याचीही जाणीव संघव्यवस्थापनास झाली.
कार्तिक हा जरी अनुभवी खेळाडू असला तरी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये फलंदाजीत त्याच्या कामगिरीत सातत्य नाही. तो 34 वर्षांचा असल्यामुळे पुढच्या विश्वचषक स्पर्धेचा विचार करताना त्याचे नाव आपोआपच वगळावे लागणार आहे. साहजिकच राहुल व पंत हेच दोन चांगले पर्याय उरतात. शिखर धवन जखमी झाल्यानंतर राहुलने सलामीचा फलंदाज म्हणून चांगले यश मिळविले आहे. या स्पर्धेत त्याला यष्टीरक्षणाची संधी मिळाली नसली तरी एरवी तो स्थानिक सामन्यांमध्ये ही जबाबदारी सांभाळत असतो. कर्नाटकला रणजी, इराणी आदी स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळविण्यात त्याने सिंहाचा वाटा उचलला आहे. एकाच वेळी सलामीवीर व यष्टीरक्षक या दोन्ही भूमिकांमध्ये तो चपखल बसतो.
राहुलप्रमाणेच पंत हादेखील सलामीवीर व यष्टीरक्षक या दोन्ही भूमिकांमध्ये अव्वल दर्जाचा खेळाडू मानला जातो. डावखुरा खेळाडू ही त्याच्यासाठी आणखी जमेची बाजू आहे. बांगलादेशविरुद्ध त्याचे अर्धशतक थोडक्यात हुकले होते. राहुलच्या तुलनेत त्याच्या खेळात अधिक आक्रमकता आहे.
केदार जाधव, ईशान किशन, संजू सॅमसन यांचीही नावे चर्चेत आहे. जाधव हा नियमितरित्या यष्टीरक्षण करीत नसतो. सॅमसन हा आक्रमक खेळाडू म्हणून ख्यातनाम असला तरी स्थानिक व आयपीएलपुरतेच त्याचे यश मर्यादित असते. किशन याच्या कामगिरीबाबत चाचपणी करण्यासाठी त्याला वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारत ‘अ’ संघात स्थान देण्यात आले आहे.