इनसाईड कांगारू लॅंडस्‌… : भारताला पुन्हा एकदा व्हाइटव्हाॅश

– श्रीनिवास वारुंजीकर

सर डॉन ब्रॅडमन युगाच्या अस्तानंतर पुणेकर चंदू बोर्डे यांच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला, तो वर्ष 1967-68 मध्ये संघात फारुख इंजिनिअर, अजित वाडेकर, दिलीप सरदेसाई असे दिग्गज फलंदाज आणि भारताचे फिरकी जादूगार मानले गेलेले इरापल्ली प्रसन्ना आणि बी. एस. चंद्रशेखर यांच्यासह सय्यद अबिद अली यांची कामगिरी चांगली झाली असली तरी भारताने ही मालिका 4-0 अशा फरकाने गमावली. या मालिकेतही आठ चेंडूंचे अष्टक गोलंदाज टाकत असत.

ऍडिलेड – 23 ते 28 डिसेंबर 1967 

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 335 धावा केल्या. त्यामध्ये बॉब कूपरच्या 92, पॉल शिहनच्या 81 आणि बॉब सिम्पसनच्या 55 धावांचा समावेश होता. भारताच्या अबिद अलींनी 55 धावांत 6, तर प्रसन्नानी 60 धावांत 3 विकेट्‌स घेतल्या. भारताने फारुख इंजिनिअरच्या 89, रुसी सुर्तींच्या 70 आणि कर्णधार बोर्डेंच्या 69 धावांच्या बळावर 307 धावांचा टप्पा गाठला. ऑस्ट्रेलियाच्या ऍलन कोलोनीने 55 धावांत 4 विकेट्‌स घेतल्या. दुसऱ्या डावात बॉब सिम्पसन (103) आणि बॉब कूपरच्या 108 अशा दोघांच्या शतकांच्या साथीने 369 धावा केल्या. विजयासाठी 397 धावांचे आव्हान भारताला पेलवले नाही. त्यांना 251 धावाच करता आल्या. त्यात व्ही. सुब्रमण्यमच्या 75 आणि रुसी सुर्ती यांच्या 53 धावांचा समावेश होता. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड रेनेबर्गने 39 धावांत 5 विकेट्‌स घेतल्या. ऑस्ट्रेलिया 146 धावांनी विजयी.

मेलबर्न – 30 डिसेंबर 1967 ते 3 जानेवारी 1968

नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी घेतली. पण हा निर्णय चांगलाच अंगलट आला. नवाब पतौडी यांच्या 75 आणि रुसी सुर्ती यांच्या 30 धावांखेरीज कोणाचीच उल्लेखनीय कामगिरी झाली नाही. सहा फलंदाज एकेरी धावसंख्या करू शकले, तर त्यातले दोघे शून्यावरच बाद झाले. भारताच्या केवळ 173 धावा व्हायला ग्लेन मॅकेन्झीचा झंझावात कारणीभूत ठरला. त्याने 66 धावांत 7 विकेट्‌स उखडल्या. मग ऑस्ट्रेलियाने निवांत खेळत 529 धावांचा डोंगर रचला. त्यात इयान चॅपेल (151), बॉब सिम्पसन (109) आणि बिल लॉरी (100) अशी तिघांची शतके, तर बॅरी जर्मनच्या 65 धावा मोलाच्या ठरल्या. प्रसन्नाने सहा विकेट्‌स घेतल्या असल्या तरी त्यांना 141 धावांचे मोल द्यावे लागले. भारताच्या दुसऱ्या डावात अजित वाडेकर यांचे शतक अवघ्या एका धावेने हुकले तर पतौडीने पुन्हा 85 धावांचे योगदान दिले. तरीही भारताला 352 पर्यंतच मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाने अखेर एक डाव 4 धावांनी कसोटी जिंकली.

ब्रिस्बेन – 19 ते 24 जानेवारी 1968 

प्रथम खेळताना ऑस्ट्रेलियाने डग वॉल्टर्सच्या 93 आणि बिल लॉरीच्या 64, पॉल शिहानच्या 58 आणि बॉब कूपरच्या 51 धावांच्या बळावर 379 पर्यंत मजल मारली. मग भारतातर्फे पतौडी आणि एम. एल. जयसिंहा अशा दोघांच्या प्रत्येकी 74 आणि रुसी सुर्तीच्या 51 धावांसह भारताने 279 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने 100 धावांच्या आघाडीत 294 धावांची भर घातली. त्यात इयान रेडपाथच्या 79 आणि डग वॉल्टर्सच्या 62 धावा मोलाच्या ठरल्या. भारताकडून प्रसन्नाने 104 धावांत 6 तर रुसी सुर्ती यांनी 59 धावांत 3 विकेट्‌स घेतल्या. या चुरशीच्या सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावात एम. एल. जयसिंहांचे शतक (101) तसेच रुसी सुर्ती यांच्या 64 आणि चंदू बोर्डे यांच्या 63 तर पतौडींच्या 48 धावांचे योगदान राहिले. भारताला 355 वर ऑस्ट्रेलियाने रोखल्याने यजमानांना 39 धावांनी विजय मिळवला.

सिडनी – 26 ते 31 जानेवारी 1968

मालिकेतला अखेरचा सामनाही ऑस्ट्रेलियाने 144 धावांनी जिंकत मालिका 4-0 अशी खिशात घातली. प्रथम खेळताना ऑस्ट्रेलियाने डग वॉल्टर्सच्या 94 आणि पॉल शिहानच्या 72 आणि बिल लॉरीच्या 66 धावांच्या जोरावर 317 धावा केल्या. भारताचा पहिला डाव 268 धावांत संपला. त्यात अबिद अलीच्या 78, पतौडीच्या 51 आणि अजित वाडेकर यांच्या 49 धावा उल्लेखनीय ठरल्या. ऑस्ट्रेलियाच्या एरिक फ्रीमनने 81 धावांत 4 विकेट्‌स घेतल्या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने केलेल्या 292 धावांत 165 धावा बॉब कूपरच्या होत्या. प्रसन्नाने 66 धावांत 3 विकेट्‌स घेतल्या तर तिघे जण धावबाद झाले. भारताला जिंकण्यासाठी 338 धावांची गरज होती. मात्र भारताचा डाव 197 धावांत संपला. त्यामध्ये अबिद अलीच्या 81 धावा लक्षणीय ठरल्या. ऑस्ट्रेलियाच्या बॉब सिम्पसन आणि बॉब कूपरने अनुक्रमे 5 आणि 4 विकेट्‌स घेतल्या आणि यजमान 144 धावांनी विजयी झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.