वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अलिकडच्या काळातील इतिहासात स्वत:ची सगळ्यांत जास्त मानहानी कोणी करून घेतली असा प्रश्न विचारला तर माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेच नाव समोर येईल. आपल्या चार वर्षांच्या काळात प्रचंड धरसोडीची धोरणे, आंतरराष्ट्रीय समुदायात देशाची घालवलेली पत, समर्थकांना चिथावणी दिल्यामुळे त्यांनी कॅपिटॉल इमारतीत घातलेला गोंधळ, पद सोडण्यास नकार एवढी सगळी पुण्यकर्मे त्यांनी केली असल्यामुळे ट्रम्प अमेरिकेसाठी एक दु:स्वप्न होते का, किंवा तेथील लोक आता तसे मानायला लागले आहेत का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
त्याचे कारण म्हणजे अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाइट हाउसच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी केलेले विधान. ट्रम्प यांच्याबाबत विचारणा केली असता त्या म्हणाल्या की आम्ही येथे व्हाइट हाउसमध्ये ट्रम्प यांच्याबाबत बोलण्यात किंवा विचार करण्यात वेळ वाया घालवत नाही. ऐकायला हे कदाचित विचित्र वाटेल. मात्र ही वस्तूस्थिती असून आम्ही त्यांच्याबद्दल चर्चाही करत नाही.
अमेरिकेतील विविध माध्यमांनी तसेच काही सोशल मीडियाने ट्रम्प यांच्यावर बंदी घातली आहे. त्यांचे अकाउंट निलंबित करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जेन साकी यांना पत्रकारांनी विचारले होते. त्यावर त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया अमेरिका आता ट्रम्प यांना विस्मृतीत पाठवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असल्याचे अधोरेखित होते.