शिरूर : एसटी बसने तुळापूर फाटा लोणीकंद ते शिरूर बायपास जवळील रिलायन्स पेट्रोल पंप दरम्यान प्रवास करताना प्रवासी महिलेचे पर्समधील तब्बल तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे.याबाबत नानासाहेब उर्फ भाउसाहेब शिवराम ज-हाड (वय ६० वर्षे धंदा शेती, रा. दसरेनगर, रूम नं. ११ वसंत टेकड़ी पाईपलाईन रोड अहमदनगर) महिलेचा पती यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्या विरोधात शिरूर पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 29 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता ते एक वाजता दरम्यान तुळापूर फाटा ते शिरूर बायपास जवळील रिलायन्स पेट्रोल पंपापर्यंत प्रवास करत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने नानासाहेब उर्फ भाउसाहेब शिवराम ज-हाड यांच्या पत्नीचे पर्स मध्ये ठेवलेले तीन तोळे वजनाची मोहन माळ व तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण असा एकूण तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिंदे हे करीत आहे.