मुंबई – शिवसेनेतर्फे सिनेअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना विधान परिषदेवर पाठवलं जाणारा असल्याची चर्चा सुरु आहे. असं असतानाच काँग्रेसतर्फे आता याबाबत एक गौप्यस्फोट करण्यात आलाय. उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसतर्फे विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत विचारणा करण्यात आल्याचं एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितलंय. काँग्रेसचा प्रस्ताव नाकारत उर्मिला मातोंडकर यांनी, ‘आपण राज्यसभेसाठी इच्छूक असल्याचं सांगत नकार दिला’ असंही या नेत्याने स्पष्ट केलं आहे.
टीव्ही ९ मराठी या नामांकित वृत्तवाहिनीशी बोलताना काँग्रेस नेते व राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी याबातची माहिती देताना, ‘आम्ही अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना संपर्क साधून विधान परिषदेसाठी विचारणा केली. पण त्यांनी राज्यसभेसाठी इच्छूक असल्याचं सांगत नकार दिला. आता जर त्यांनी शिवसेनेची ऑफर स्वीकारली असेल तर त्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे.’ असा गौप्यस्फोट केला आहे.
उर्मिला मातोंडकर मराठी असून त्यांनी कंगना रानौतविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेला त्यांना संधी द्यावीशी वाटणं स्वाभाविक आहे, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी उर्मिला काँग्रेसच्या लोकसभा २०१९ निवडणुकांमधील उमेदवार होत्या अशी आठवणही करून दिली.
खडसेंना मंत्रिपद?
नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले भाजप नेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीतर्फे विधानपरिषदेवर घेऊन मंत्रिपद बहाल करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादीच्या एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. याबाबत खडसे यांना स्वतः शरद पवार यांनी शब्द दिलेला असल्याने पवार राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांचा राजीनामा घेऊ शकतात अशीही चर्चा आहे.