मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने 4 मार्चला एक निर्णय दिला आणि महाराष्ट्रतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीला देण्यात आलेले आरक्षण रद्द करण्यात आले. त्यानंतर त्या आदेशाविरोधात पुनर्विचार याचिका राज्याने दाखल केली, तीदेखील सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केली. त्यामुळे महाराष्ट्रात ओबीसीकरता कोणतेही आरक्षण राहिलेले नाही, ही बाब विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केली.
सोमवारी घेण्यात आलेल्या एक पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील सत्ताधाऱ्यांना निशाण्यावर घेतले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही कटाक्ष टाकला. ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत असताना मंत्री मात्र मोर्चे काढण्यात मग्न असल्याचे म्हणत त्यांनी शाब्दिक फटकेबाजी केली.
15 महिने या सरकारने काहीच केले नाही, असे म्हणत आपल्याला या बाबतीत राजकारण करायचे नाही, पण प्रत्येक गोष्टीसाठी सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून मागच्याच सरकारला दोष लावण्यात येत आहे. पण, मुळात राज्याने मागास आयोगाची स्थापना करुन तपशील गोळा करत असल्याची माहिती दिली असती तर आरक्षण रद्दच झाले असे म्हणत सरकारच्या भूमिकेवर त्यांनी तोफ डागली.
ज्या राज्यांमध्ये ओबीसींना 50 टक्क्यांच्या वर आरक्षण आहे ते 50 टक्क्यांच्या आत आले पाहिजे अशी मागणी करणारी याचिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमचे सरकार होते त्यावेळी न्यायालयात बरेच वाद – प्रतिवाद झाले. हे आरक्षण प्रत्येक जिल्ह्यात सरसकट 27 टक्के असू शकत नाही, म्हणून तुम्ही ते सरासरीच्या प्रमाणाने द्यावे, अशी मागणीही करण्यात आली. यासंबंधीचा अध्यादेश काढत आम्ही 90 जागा वाढवल्या. अशातच ठाकरे सरकार सत्तेत आले आणि पुढं आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खटला सुरु झाला, असे त्यांनी स्पष्ट केले.
खोटं बोलण्याची स्पर्धा जगात भरवली गेली, तर पहिल्या दहामध्ये हेच येतील, असे म्हणत फडणवीसांनी ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर टीका केली. मराठा आरक्षणामागोमाग आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही हे नेते खोटं बोलत असल्याचे सांगत आपले म्हणणे कोणीही गांभीर्याने घेतले नसल्याची नाराजी तीव्र शब्दांत व्यक्त केली.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठीही आपण तयार असल्याचे म्हणत यासाठी कोणासोबतही चर्चा करु. राजकारण मागे ठेवून यासंदर्भात आम्ही चर्चा करु, पण यावेळी समोरच्यांनीही राजकारण करु नये असा स्पष्ट आग्रही सूर त्यांनी आळवला.