चिपळूण – नवे केंद्रीय मंत्री नारायण राणे आज चिपळूणातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी येथे आले होते. पूरग्रस्तांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला. त्यावेळी त्यांच्याशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरल्याने तो एक वादाचा विषय बनला आहे.
राणे यांच्याशी बोलताना जिल्हाधिकारी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या संबंधात माहिती सांगत होते. त्यावेळी राणे त्यांना म्हणाले की, ते सीएम बीएम वगैरे मला काही सांगू नका, सीएम गेला उडत असे उद्गार त्यांनी काढले.
आमच्या दौऱ्याच्यावेळी कोणताच सरकारी अधिकारी येथे उपस्थित नसल्याने त्यांनी हे संतप्त उद्गार काढले. आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिले आता तुम्हाला जागेवर बसू देणार नाही असे शब्दही राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना वापरले. मी चिपळूणच्या बाजारपेठेत उभा आहे मला सरकारचा एकही अधिकारी भेटलेला नाही, असेही राणे यांनी त्यांना खडसावले.
यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्यांच्या समवेत होते. जिल्हाधिकारी हे मुख्यमंत्र्यांसमवेत त्यांच्या दौऱ्यात उपस्थित होते तर प्रांत अधिकारी पालकमंत्र्यांबरोबर उपस्थित होते मग येथे कोणीच कसे नाही, असा सवाल राणेंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे उपस्थित केला.