पुणे – ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला अवघ्या दीड मिनिटात चीतपट करत 65 व्या राज्य अजिंक्यपद कुस्ती व प्रतिष्ठेच्या ‘महराष्ट्र केसरीची गदा’ पटकावली. शिवराज राक्षेच्या रूपाने महाराष्ट्राला नवा ‘महाराष्ट्र केसरी’ मिळाला आहे. तर, स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या महेंद्र गायकवाड याला उपमहाराष्ट्र केसरीवर समाधान मानावे लागले.
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला मानाची गदा, महिंद्रा थार ही गाडी व रोख पाच लाख रुपयांचे बक्षीस तर उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याला मानाची गदा, ट्रक्टर व रोख अडीच लाख रुपये देवून सन्मानित करण्यात आले. पुण्यात हा अंतिम सामना रंगला असून, यावेळी हजारोंची गर्दी पाहायला मिळाली.
या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप खासदार ब्रृजभूषण सिंग यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. त्याचप्रमाणे कुस्तीमधील अनेक दिग्गज मंडळही आली होती. तसेच, अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडेंनीही मोठ्या उत्साहानं हजेरी लावली असल्याचं दिसून आलं.
दरम्यान, शिवराज राक्षे हा यंदाचा महाराष्ट्र केसरी म्हणून घोषित झाल्यानंतर प्रवीण तरडेंनीही त्याचे अभिनंदन करत ‘कुस्तीच महाराष्ट्राचा खरा मोठा खेळ आहे आणि राहणार’ असं म्हंटल आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत ते बोलत होते. तसेच, त्यांनी यावेळी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे यंदाचे आयोजक मुरलीधर मोहोळ यांचंही विशेष कौतुक केलं आहे.
प्रवीण तरडे म्हणाले, ‘मुरलीधर मोहोळ यांनी ज्या प्रकारे कुस्तीला मोठं केलं आहे हे खूप आनंददायी आहे. कुस्ती हीच महाराष्ट्राची आणि लाल मातीची खरी ओळख आहे. इथे जमलेल्या लाखो लोकांनी दाखवून दिलं की, कुस्तीच महाराष्ट्राचा खरा मोठा खेळ आहे आणि राहणार… मी ही पैलवान तरडेच आहे. मीही दोन वर्ष कोल्हापूरात मोतीबाग तालमीत गणपत आमदाळकरांकडे कुस्तीचे धडे घेतलेत’. असं देखील प्रवीण तरडे यावेळी म्हणाले.