मोलकरणींचा पगार देताना मन मात्र कोते

गर्भश्रीमंतांच्या गृहसंकुलातील वास्तव 

पुणे, दि. 2 -करोनाचा धोका सुरू झाल्यानंतर देशात लॉकडाऊन करण्यात आला. त्यावेळी विविध घरांमध्ये काम करत असलेल्या मोलकरणींनाही घरातच बसावे लागले. गर्भश्रीमंतांच्या गृहसंकुलातही हेच चित्र दिसत होते. मात्र, अनलॉकमध्ये सवलती दिल्यानंतरही अनेक घरांतील कुटुंबांनी घरकाम करणाऱ्या महिलांना तसेच अन्य कर्मचारी वर्गाला गेल्या पाच महिन्यांचा पगार देताना वाटाण्याच्या अक्षदा लावल्याचे दिसून आले आहे. 

कोथरूड येथील एका गृहसंकुलात काम करत असलेल्या अनेक महिलांनी याबाबत तक्रारीचा सूर लावला आहे. काही घरांत तर यातील काही महिला गेल्या दहा वर्षांपेक्षाही जास्त काळ काम करतात. सकाळी कामावर येत बाल्कनीत वाळत घातलेले कपडे निटनेटके ठेवण्यापासून रात्रीच्या स्वयंपाकापर्यंत सर्व कामे करावी लागतात. मात्र, एप्रिल महिन्यापासून कामावर येता आले नाही म्हणून स्थानिक प्रशासनाने सूचना केल्यानंतरही त्यांना पूर्ण पगार देण्यात आलेला नाही.

आमचाच व्यवसाय आर्थिक गर्तेत सापडलेला आहे, नोकरीतून मिळणारा पगारही कमी प्रमाणात येत आहे. सध्या केवळ 5 हजार रुपये देतो दीवाळीनंतर उर्वरित रकमेचे पाहू. जितके दिवस कामावर आला नाहीत त्याचा पगार कसा देणार ही व अशी अनेक उत्तरे घरमालकांनी तयार केल्याचेच दिसून येत आहे.

एकीकडे पिझ्झा, बर्गर किंवा तयार पदार्थ मागवले जात आहेत आणि ज्यांच्या जीवावर गेली दहा वर्षे घर सोडून गेले त्यांच्या विश्‍वासार्हतेची हीच किंमत केली गेली. हे वास्तव सध्या पुण्यात, राज्यातच नव्हे तर देशाच्या अनेक शहरांमध्ये दिसत आहे. वसाहत गर्भश्रीमंतांची पण मन मात्र कोत्या वृत्तीचे असेच चित्र दिसत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.