विचारांची झेप घ्यायची कुवत नसली की अनेकांना सह्याद्री टेकाडासारखा दिसतो

 शिवसेनेची सामनामधून भाजपवर पुन्हा टीका

मुंबई : राज्यात अनेक नाट्यमय घडामोडीनंतर महाविकास आघाडीचे स्थिर सरकार स्थापन झाले आहे. शनिवारी बहुमत चाचणी आणि रविवारी विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीनंतर राज्यात स्थिर सरकार स्थापन झाले. दरम्यान, या गोंधळात शिवसेनेकडून भाजपवर टीका करणे काही केल्या थांबत नाही. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. या निवडीवरून शिवसेनेनं भाजपाला कायद्यानं राहण्याचा सल्ला दिला आहे. महाविकास आघाडीकडं बहुमताचा आकडा नाही, असे म्हणणाऱ्यांनाही शिवसेनेने उत्तर दिले आहे. विचारांची झेप घ्यायची कुवत नसली की अनेकांना सह्याद्री टेकाडासारखा दिसतो तसेच हे बहुमताच्या बाबतीत झाले, असे सेनेने म्हटले आहे.

अनेक नाट्यमय आणि उत्कंठावर्धक घडामोडींनंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आले. त्यानंतर बहुमताच्या आकड्यावरून भाजपानं महाविकास आघाडीकडं बहुमत नसल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत चाचणीवेळी नियमांवर बोट ठेवत सभात्याग केला होता. या सर्व घडामोडींवर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपाचा समाचार घेतला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. सरकारचे बहुमत काठावरचे नाही, तर चांगले दणदणीत आहे. सरकारच्या बाजूने 170 आमदारांचे बळ आहे हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतोच, पण फडणवीस यांच्या पाळीव पिलावळीच्या चष्म्यांतून आकडा 130 च्या वर जायला तयार नव्हता. विचारांची झेप घ्यायची कुवत नसली की अनेकांना सह्याद्री टेकाडासारखा दिसतो तसेच हे बहुमताच्या बाबतीत झाले. 170 चा आकडा पाहून फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षाने विधानसभेतून पळ काढला. रविवारी विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची निवडदेखील बिनविरोध झाली. शनिवारचा आकडा बहुधा भाजपवाल्यांच्या डोळयांत व डोक्‍यांत घुसल्याचा परिणाम असा झाला की, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून त्यांना माघार घ्यावी लागली. आता पुढील पाच वर्षे त्यांना अशा माघारीची सवय ठेवावी लागेल, असं शिवसेनेनं म्हटलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.