वडापुरी – रंगपंचमी दिवशी आपल्या मैत्रिणीबरोबर रंग खेळून झाल्यावर गप्पा मारत बसल्यानंतर अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी गावात घडली. अशी माहिती सरडेवाडीचे माजी उपसरपंच सदस्य सतिश चित्राव यांनी दिली.
सृष्टी सुरेश एकाड (वय 16, रा. जाधववस्ती नजीक, सरडेवाडी, ता. इंदापूर) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. रविवारी (दि. 12) रंगपंचमी निमित्ताने आपल्या मैत्रिणींबरोबर एकमेकींना रंग लावून तिने रंगपंचमीचा आनंद घेतला. मुक्तछंदपणे नैसर्गिक रंगांची उधळण केल्यानंतर ती आपल्या मैत्रिणींबरोबर हसत खेळत बागडत होती; मात्र याचवेळी अचानक सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान तिला तीव्र हृदयविकाराचा झटका आला.
चुलते सचिन एकाड आणि मनोज चित्राव यांनी लागलीच तिला उपचार कामी इंदापूर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सृष्टी ही इंदापूर शहरातील नारायणदास रामदास हायस्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होती. सोमवारी (दि. 13) दहावीचा पेपर देण्यापूर्वीच तिचे निधन झाले.