वृंदावन – अभिनेत्री कंगना रानौत ही सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात राहणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. कधी आपल्या बेताल वक्तव्यांमुळे, कधी आपल्यातील अभिनयाच्या गुणांमुळे तर कधी आपल्या लव्ह लाईफमुळे – कंगना नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. अशातच आज कंगनाने उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील बांके बिहारी मंदिराला भेट देत येथे पूजा-अर्चा केली.
अर्थातच तिच्या मंदिर भेटीचा कार्यक्रम गोपनीय होता. मात्र कंगना मंदिरात आल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि तिची एक झलक पाहण्यासाठी हजरोंची गर्दी जमली. पोलिसांना गर्दी रोखण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
दरम्यान, पत्रकारांनी यावेळी कंगनाला, निवडणुकीत कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार? असा प्रश्न विचारला. यावर कंगनाने उत्तर देताना, ‘जे राष्ट्रवादी आहेत त्यांच्यासाठी मी प्रचार करेन. मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही आणि प्रचारावेळीही अशाच पक्षाला सपोर्ट करेन जो पक्ष राष्ट्रवादी आहे.’ असं स्पष्ट केलं.
राजकीय मुद्दे आणि कंगनाची वादग्रस्त वक्तव्य
गेल्या काही महिन्यांमध्ये कंगनाने अनेकदा राजकीय मुद्द्यांवर वक्तव्य केली आहेत. काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उठवण्यापासून ते पंतप्रधानांनी कृषी कायदे मागे घेतल्यानंतर थेट या निर्णयाला विरोध करणारी भूमिका कंगनाने घेतली आहे. दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर तर कंगनाने पातळीसोडून टीका करताना हे खलिस्तानी असल्याचं म्हंटल होत. यावरून बराच वाद देखील झाला होता. कंगना काही दिवसांपूर्वीच पंजाब येथे गेली असता तिची गाडी अडवण्यात आली होती. तिला यावेळी माफी देखील मागावी लागली होती.