कोणता पक्ष राखणार खडकवासल्याचा गड?

खडकवासला मतदार संघातील गेल्या काही वर्षांतील राजकारणाची गणिते पाहता, या मतदार संघात सर्वाधिक नगरसेवक आहेत राष्ट्रवादीचे, पण विधानसभेला उमेदवार निवडून येत आहेत. अन्य पक्षांची अशीच स्थिती या मतदार संघातील आहे. 2009 मध्येसुद्धा या ठिकाणी मनसेकडून रमेश वांजळे निवडून आले होते. त्यावेळी या भागातील बहुतांशी नगरसेवक हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे होते. त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येण्यास कुठलीही अडचण नव्हती, पण त्यावेळी अगदी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या मनसे पक्षाचे उमेदवार रमेश वांजळे यांनी बाजी मारत निवडणूक जिंकली होती. आमदारपदाच्या कार्यकाळातच त्यांचे अकाली निधन झाले आणि तेथे पोटनिवडणूक जाहीर झाली. यात पालिकेत अनेक वर्षे नगरसेवक असणाऱ्या भीमराव तापकीर यांना भाजपने मैदानात उतरविले. त्यावेळी राष्ट्रवादीचे अनेक इच्छुक असताना त्यावेळचे पालकमंत्री अजित पवार यांनी वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे यांना राष्ट्रवादीमध्ये घेऊन त्यांना तिकीट दिले, पण मतदारांनी हर्षदा वांजळे यांना नाकारले आणि भीमराव तापकीर हे विजयी झाले.

राष्ट्रवादीची ताकद असणारा हा मतदार संघ भाजपच्या ताब्यात गेला. त्यानंतर 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत ही मोदी लाटेमुळे हा गड तापकीर यांनी पुन्हा राखला. खडकवासला विधानसभा क्षेत्र ज्या लोकसभा मतदार संघात येते, त्या बारामती मतदारसंघाच्या खासदार या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुप्रिया सुळे आहेत. त्याचबरोबर या मतदार संघात राष्ट्रवादीचे जास्त नगरसेवक आहेत. ग्रामीण भागात राष्ट्रवादीचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. असे असताना राष्ट्रवादीला हा मतदार संघ अद्याप जिंकता आलेला नाही. ही खंत अजूनही राष्ट्रवादीच्या नेत्यांना सतावत आहे. 2014 नंतर झालेल्या पालिकेच्या निवडणुकीतही या भागात भाजप आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक जास्त निवडून आले आहेत. सध्या भाजप नगरसेवकांची संख्या जास्त असली, तरी राष्ट्रवादीचे पालिकेतील अनेक दिग्गज नेते याच मतदार संघातील आहे. भाजपव्यतिरिक्त शिवसेनेची ताकद या मतदार संघात ग्रामीण भागात आहे. खेड-शिवापूर, खानापूर, पानशेत खोरे भागात शिवसेनेचा जोर आहे. खेड-शिवापूरचे जि.प. सदस्यसुद्धा शिवसेनेचे आहेत, पण या ताकदीचा फायदा शिवसेनेला अजून उठविता आलेला नाही. कॉंग्रेसची काही पारंपरिक नेते मंडळी या भागात आहेत, पण सध्या तरी कॉंग्रेसची ताकद संघटनात्मक पातळीवर थोडी कमी आहे.

प्रामुख्याने हा मतदार संघ ग्रामीण आणि शहरी अशा दोन भागांत विभागला गेला आहे. धनकवडी, सिंहगड रोड, धायरी, नांदेड सिटी या शहरी भागाबरोबर सिंहगड पायथा, खानापूर, खेड-शिवापूर, पानशेत खोरे हा भागसुद्धा या मतदार संघात येत आहे. असा दोन्ही भागांत विभागलेल्या या मतदार संघातील नागरिकांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे या दोन्ही भागांतील समस्या गेल्या पाच वर्षांत सोडविण्याचा प्रयत्न केल्याचा दावा सर्वच राजकीय नेते करत आहेत. युती झाली, तर हा मतदार संघ नक्की कोणाला जाणार हे अद्याप निश्‍चित झालेले नसल्याने भाजपा-शिवसेनेमध्ये सध्या “वेट ऍन्ड वॉच’चे वातावरण आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी होऊन हा मतदार संघ राष्ट्रवादीकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाल्याने या भागातील राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.