कोणता झेंडा घेऊ हाती?

कार्यकर्त्यांची द्विधा मनस्थिती
नितीन साळुंखे

नागठाणे  – सातारा लोकसभा निवडणुकीचे पडघम सध्या जोरात वाजू लागले असून उमेदवारांच्या प्रचाराला रंगत येऊ लागली आहे. सातारा लोकसभा निवडणुकीत सध्या नऊ उमेदवार रिंगणात असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षांचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले व भाजप-शिवसेना युती व मित्रपक्षांचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यातच खरी व तुल्यबळ लढत होत आहे. मात्र सध्या कराड उत्तर विधानसभा मतदार संघात मूळचे खासदार गटाचे असणारे कार्यकर्ते केवळ तडजोडीने “भाजप’वासी झाले असल्याने यावेळी ते नेमका कोणता झेंडा हाती घेणार? याकडे या भागातील जनतेचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणूक लागण्यापूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवरून चांगलेच रान तापले होते. यावेळी खा. उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये जातील अशी अटकळ बांधून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील अनेक निष्ठावंत कार्यकर्ते अगोदरच भाजपवासी झाले. त्यापैकी अनेकांना भाजपने पक्षाच्या विविध मोठ्या पदांवर वर्णी देखील लावली. त्यामुळे सध्या या मतदार संघात खासदार गटाचेच कार्यकर्तेही भाजप कार्यकर्ते म्हणून ओळखले जात आहेत. मात्र सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षाकडून यावेळची सातारा लोकसभेचे तिकीट पुन्हा एकदा खा. उदयनराजे भोसले यांनाच देण्यात आले आहे. तर दुसरीकडे भाजप-शिवसेना मित्रपक्षाकडून ऐनवेळी भाजपातून शिवसेनेत पाठविण्यात आलेल्या माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली. सातारा लोकसभा मतदार संघात जरी सध्या नऊ उमेदवार रिंगणात असले तरी या दोघांच्यातच खरी लढत होणार आहे. आणि नेमकी इथेच भाजपवासी झालेल्या खासदार गटातील कार्यकर्त्यांची गोची झाली आहे.

सध्या कराड उत्तर विधानसभामतदारसंघातील या दोन डगरीवर पाय ठेऊन उभ्या असणाऱ्या कार्यकर्त्यांना नेमके आता कोणाचा प्रचार करायचा? या मोठ्या प्रश्‍नाने भेडसावले आहे. मूळचे खासदार गटाचे असणाऱ्या या कार्यकर्त्यांनी नेते भाजपमध्ये जातील अशी धारणा झाल्याने यापूर्वीच भाजपमध्ये बस्तान बसवले. पण आता या भागातील बहुतांश कार्यकर्ते भाजपात तर त्यांचे नेते मात्र राष्ट्रवादीमध्येच थांबल्याने आता करायचे काय? ही विवंचना लागली आहे.

भाजपात राहून राष्ट्रवादीमधील आपल्या नेत्याचा प्रचार करायचा ? की भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करायचा? या द्विधा मनस्थितीत येथील कार्यकर्ते आहेत. यापैकी बहुतांश निष्ठावान कार्यकर्ते हे पुन्हा राजे समर्थक म्हणून माघारी फिरण्याच्या भूमिकेत असून काही अद्यापही तळ्यात-मळ्यातच्या भूमिकेतच आहेत. त्यामुळे नेमके हे कार्यकर्ते या दोन्ही उमेदवारांपैकी नेमका कोणाचा प्रचार करणार? याबाबत येथील जनतेत मात्र खुमासदार चर्चा सध्या सुरू आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.