पिंपरी – राष्ट्रवादीची सत्ता असताना शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची पाहणी विरोधी पक्षनेते अजित पवार हे वेळोवेळी करीत असे. मात्र, भाजपच्या पाच वर्षांच्या कालावधीत कोणत्या केंद्रीय अथवा महाराष्ट्रातील नेत्याने शहरातील प्रकल्पांची पाहणी केली, असा सवाल राष्ट्रवादीचे भोसरी विधानसभेचे अध्यक्ष पंकज भालेकर यांनी केली.
दै. “प्रभात’च्या पिंपरी कार्यालयातील गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते. या वेळी बोलताना भालेकर म्हणाले, “”राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवीन शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. निवडणुकीपूर्वी भाजपने नागरिकांना भरभरून आश्वासने दिली. मात्र दिलेल्या आश्वासनांपैकी भाजपने एकही आश्वासन पूर्ण केले नाही. शहराचा खरा विकास हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने केला असल्याची खात्री आता मतदारांना पटली आहे.
भाजपने फक्त भ्रष्टाचाराचे काम केले आहे. दीड वर्षापूर्वी भाजपच्या उपमहापौराला खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली. त्यानंतर स्थायी समितीच्या अध्यक्षाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. यामुळे महापालिकेची संपूर्ण देशात बदनामी झाली. भय ना भ्रष्टाचाराचा नारा देणाऱ्या भाजपने महापालिकेच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदाच करून दाखविले आहे.