मुंबई – शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांची आज भेट घेतली. या मेळाव्यासाठी शिवसेनेकडून गेल्या महिन्यातच अर्ज करण्यात आला होता. मात्र अद्याप विधी विभागाकडून कोणताही निर्णय आलेला नाही, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
शिवसेना नेते मिलिंद वैद्य यांनी ही माहिती दिली. शिवाजीपार्कवर दसरा मेळावा कोण घेणार, यावरून शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात वाद रंगला आहे. महापालिकेने अद्याप कुणालाही शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिलेली नाही. पण परवानगी मिळो अथवा न मिळो, बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक शिवाजी पार्कमध्ये उपस्थित राहणार, आणि मेळाव्यासाठी एकत्र जमणार, असे वक्तव्य मिलिंद वैद्य यांनी केले आहे. दरम्यान, शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी बीकेसी मैदानाकरिता अर्ज दाखल केला होता. याला महापालिकेकडून परवानगीही देण्यात आली आहे. मात्र शिवसेनेच्या मेळाव्याला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.
दोनच दिवसांपूर्वी उध्दव ठाकरे यांनी मेळाव्याच्या तयारी लागण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे शिवसैनिकांच्या गोटात उत्साह संचारला आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही याबाबत उध्दव ठाकरेंनाच मेळावा घेण्याचा हक्क असल्याचे सूचक विधान केले आहे. मात्र परवानगीच्या नावावर शिवसेनेला अडवून ठेवण्याचा प्रकार सुरू आहे का, अशी चर्चा आहे.
शिंदे गटाची अडचण होणार म्हणून…
लोकशाहीत संख्याबळाचे राजकारण वरचढ ठरते. त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी सेनेत उभी फूट पाडून मुख्यमंत्रिपद पटकावले. मात्र हा झाला विधानसभेतील मामला. राजकारणत जनता तुमच्यासोबत आहे का, तुमचे बंड लोकांना रूचले आहे का किंवा तुमची कृती जनतेला मान्य आहे का, याचा फैसला मतपेटीतून होत असतो.
तो फैसला महापालिका निवडणुका आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांतून समोर येईलच. मात्र काही आमदार गेले तरी अनेक शिवसैनिक व जनमत उध्दव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती बाळगून असल्याची सार्वत्रित भावना आहे. दसरा मेळाव्याला जर गर्दी झाली तर त्यावर शिक्कामोर्तबच होईल. त्यातून कुठेतरी शिंदे गटाची पिछेहाटही होऊ शकते ही सगळी कारणे या परवानगी नाट्यामागे असू शकतात.