Ajit Pawar Death : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीमध्ये भीषण अपघात झाला आहे. या विमान अपघातात अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दादा’ म्हणून आपली खास ओळख निर्माण करणारे अजित अनंतराव पवार यांची अचानक एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार आज आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीच्या दौऱ्यावर होते. आज दिवसभरात त्यांच्या चार भव्य सभांचे आयोजन करण्यात आले होते. या नियोजित दौऱ्यासाठी ते सकाळी विमानाने बारामतीला पोहोचले. मात्र, विमानतळावर उतरत असताना लँडिंग दरम्यान हा भीषण अपघात झाला. अजितदादा हे राजकारणातील धडाडीचे व्यक्तिमत्व होते. आपला धारदार आवाज आणि स्पष्टवक्तपणामुळे ते जनमानसात ओळखले जायचे. आपले काका शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे गिरवून लोकांमध्ये जाऊन स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणारे अजित पवार यांची राजकीय कारकीर्द पाहूयात… अजित पवारांची राजकीय कारकीर्द महाराष्ट्रातील राजकारणात धाडसी आणि तळागाळातील लोकांमध्ये जाऊन आपली ओळख निर्माण करणाऱ्या अजित पवार यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यात 22 जुलै 1959 साली झाला. 1982 साली त्यांनी स्थानिक राजकारणात प्रवेश केला. त्यांचे काका शरद पवार यांच्यासोबत त्यांनी काँग्रेस पक्ष आणि नंतर फुटलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भल्या पहाटे उठून काम करणाऱ्या नेत्यांमध्ये अजित पवार यांचं हमखास नाव घेतलं जायचं. 7 वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावे होता. प्रशासनावर असलेला त्यांचा वचक आणि राजकारणतला त्यांचा दबदबा सर्वश्रुत होता. एखादे काम करून देणे, तसेच होणार नसेल तर ते स्पष्टपणे सांगणे, अशी धडाकेबाज त्यांची ओळख होती. शरद पवार यांच्या सरकारमध्ये मिळाली मोठी जबाबदारी शरद पवार 1993 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा अजित पवार यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यानंतरही ते सरकार आणि संघटनेत महत्त्वाच्या भूमिका बजावत राहिले. 2010 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युती सरकारमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अजित पवार यांचा राजकीय लौकिक आणखी वाढला. गेल्या चार दशकांहून अधिक काळ राजकीय अनुभव असलेले अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे एक कुशल रणनीतीकार आणि मजबूत प्रशासक मानले जात होते. विकास, प्रशासनावरील पकड आणि जलद निर्णय घेण्याची क्षमता या गुणांमुळे ते राज्यातील एक प्रभावी नेते बनले. सत्तेत असो वा विरोधात, अजित पवार नेहमीच राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले. राजकारणाव्यतिरिक्त अनेक मोठे कामे राजकारणाव्यतिरिक्त अजित पवार यांचा सहकार क्षेत्रातही मोठा प्रभाव होता. ते महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांशी संबंधित होते आणि पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. ते महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांशी संबंधित होते आणि पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. काकांपासून वेगळी वाट जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख झाला, तेव्हा अजित पवार हे नाव अग्रक्रमानं समोर आलं. मात्र एनडीए सोबतच्या आघाडीवरून शरद पवार आणि अजित पवार यांच्या विचारसरणीत बदल झाला. शेवटी अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर त्यांच्यावर टिकाही झाली, परंतु तेथेही त्यांनी आपल्या कामकाजाने जनतेची मनं जिंकली. परंतु आता त्यांच्या विमान अपघातातील मृत्यूच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला…. Rahul Gandhi : अजित पवार यांच्या निधनानंतर राहुल गांधी भावुक ; ट्विट करत म्हणाले,” ही बातमी ऐकून खूप”