पोलीस जिथे अडवतील, तिथेच ठिय्या आंदोलन; कृती समिती आंदोलनावर ठाम

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वाद विकोपाला

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वाद  आता विकोपाला जात असल्याचे दिसत आहे.  विमानतळाला नाव देण्यासाठी वेगवेगळ्या नावांची मागणी करण्यात आली असून, विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जावे, यासाठी स्थानिकांनी  आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यातच कृती समिती आंदोलन करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे.

१० जून रोजी रायगड, नवी मुंबई, पालघर व ठाणे या चारही जिल्ह्यातील नागरिकांनी विमानतळाला दि. बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी मानवी साखळी करून लक्ष वेधले  होते. त्यानंतर आज सिडको भवनाला घेराव घालण्यात येणार असून, रस्ते बंद करण्यात आले आहेत. यापार्श्वभूमीवर जिथे पोलीस अडवतील, तिथेच ठिय्या आंदोलन केले जाईल, अशी भूमिका कृती समितीने घेतली आहे.

नवी मुंबईतील सिडको भवनाला आंदोलक आज  घेराव घालणार आहेत. विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाऐवजी प्रकल्पग्रस्त नेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीने जोर धरला असून, बेलापूर येथील सिडकोच्या मुख्यालयाला हजारोच्या संख्येने घेराव घालण्यासाठी प्रकल्पग्रस्त आणि इतर राजकीय पक्षांतील कार्यकर्ते सकाळपासून सिडको कार्यालयाकडे रवाना होत आहेत.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सिडको मुख्यालयाकडे येणाऱ्या चारही मार्गांची बुधवारपासून नाकाबंदी सुरू केली. त्यासाठी सात हजार पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. या भागात सर्व प्रकारच्या खासगी वाहतुकीला सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. हे आंदोलन सर्वपक्षीय असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, सिडको भवनाला घेराव घालण्यासाठी दि.बा. पाटील कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलक गर्दी सिडको कार्यालयाकडे जात आहेत. पोलिसांकडून रस्ते बंद करण्यात आले असले, तरी आंदोलकांना अडवलं जात नसल्याचं कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. मात्र, पोलिसांंनी अडवलं, तिथंच ठिय्या आंदोलन केलं जाईल, अशी भूमिका समितीने मांडली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.