विखे जेथे जातात तेथे वातावरण बिघडवतात

राम शिंदे यांचा आरोप : नाशिकला पराभवाची समीक्षा करण्यासाठी बैठक

नगर – विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपची पीछेहाट झाली. पराभूत झालेल्यांनी याचे खापर थेट माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर फोडत त्यांची तक्रार थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यामुळे विखे यांच्याबद्दल पक्षात नाराजी वाढली होती. या पराभवाची समीक्षा करण्यासाठी नाशिक येथे आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत पराभूत आमदारांनी विखे यांना चांगलेच लक्ष केले. त्यांनी आमच्या पराभवास विखे हेच जबाबदार असल्याचा आरोप केला. ते ज्या पक्षात जातात, तिथं खोड्या करतात. त्या पक्षासाठी हानिकारक वातावरण निर्माण करतात,’ असा थेट आरोप माजी मंत्री राम शिंदे यांनी यावेळी केला.

राज्यातील विविध विभागांत भाजपच्या झालेल्या पराभवाची कारणमीमांसा करण्याचं काम सध्या पक्षपातळीवर सुरू आहे. त्यानुसार, आज आ. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची नाशिक येथे बैठक पार पडली. यावेळी शेलार यांनी जिल्ह्यातील पराभूत उमेदवार माजी मंत्री राम शिंदे, शिवाजीराव कर्डिले, स्नेहलता कोल्हे आदींशी चर्चा केली. यावेळी या तिन्ही पराभूत उमेदवारांनी विखे यांच्यावरच पराभवाचा ठपका ठेवला. आमच्या पराभवास विखे हेच जबाबदार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माजी मंत्री शिंदे यांनी विखे यांच्यावर निशाना साधला. शिंदे म्हणाले, नगर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार होते. विखे व पिचड पिता-पुत्रांना पक्षात घेतल्यानंतर ही संख्या सात झाली. मात्र विधानसभा निवडणुकीत ही संख्या तीन पर्यंत खाली आली. प्रचारात 12-0 ने जिंकू असे, विखे म्हणत होते. त्यांची काही फार ताकद होती, असं नाही. पण जी काही होती, त्याचा काहीही फायदा झालेला नाही. उलट अनेकांचा सूर त्यांच्या विरोधात आहे. ते जिथं जातात, तिथं वातावरण बिघडवतात,’ असा थेट आरोपच शिंदे यांनी केला.

कोल्हे यांनी देखील हीच री पुन्हा ओढली. त्या म्हणाल्या, विखे यांनी कोपरगाव मतदारसंघात स्वत:च्या मेहुण्याला अपक्ष म्हणून उभे केले. पण त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. आपणही शिंदे व कोल्हे यांच्या मताशी सहमत आहे, असे शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले.
एकनाथ खडसे व पंकजा मुंडे यांनी पराभवानंतर पक्षाला लक्ष्य केले आहे. त्यामुळे पक्षांतर्गत खदखद आता चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे त्यांच्यासारखीच भूमिका आपण घेणार का, असे विचारले असता, शिंदे म्हणाले, ‘माझ्यापुरतं म्हणाल तर पक्षाला दोष देण्यात अर्थ नाही. पक्षानं मला तीनदा उमेदवारी दिली. आमदार झालो. मंत्री केले. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा दोष पक्षावर टाकणे योग्य नाही. आमच्या मतांची दखल घेतली, हे चांगले झाले. कोअर कमिटीत चर्चा होईल व कारवाई होईल,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.