दखल: मराठी पाऊल अडते कुठे?

सागर ननावरे

आज मराठी शाळांची संख्या ही मराठी भाषिक जनतेच्या उत्साहावर तारणार आहे. “मराठी पाऊल पडते पुढे’ म्हणण्याऐवजी “मराठी पाऊल अडते कुठे?’ हे शोधण्याची वेळ आली आहे. याला कारणीभूत दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे, इंग्रजी शिक्षणातूनच उत्तम करिअर घडते हा समज आणि दुसरी गोष्ट म्हणजे, मराठी शाळेत स्वतः शिकल्याची किंवा पाल्यांना शिकविण्याची वाटणारी लाज आणि भीती.

माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृताते हि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वरांनी मराठी भाषेचे कौतुक करताना तिची तुलना अमृताशी केली. मायमराठी भाषा ही महाराष्ट्राची राजभाषा. आपण सर्वजण मराठीचे गोडवे अभिमानाने गातो; परंतु काय खरंच तिच्या संवर्धनासाठी आपण कटिबद्ध आहोत? गेल्या आठवड्यात महाराष्ट्राची उपराजधानी असणाऱ्या नागपूर शहरात महानगरपालिकेने मराठी माध्यमाच्या 35 शाळा बंद केल्या. विशेष म्हणजे त्याठिकाणी मोठमोठे मॉल्स उभारले जाणार आहेत. मॉल्स आले की समजून घ्यायचे तिथे फाडफाड इंग्रजी बोलणारे कर्मचारी नियुक्‍त केले जाणार आणि मराठी शाळांच्या जागेवर इंग्रजी संभाषणाचा बाजार वधारणार; परंतु त्याठिकाणी असणारा ग्राहक हा मराठी भाषिकच असणार. इंग्रजी भाषेचा स्वीकार करण्यात काहीही गैर नाही. किंबहुना ती काळाची गरजच आहे.

परंतु मराठी भाषेची गळचेपी करून इंग्रजीचा अट्टहास करणे मायमराठी संस्कृतीसाठी नक्‍कीच धोकादायक आहे. हा सर्व प्रकार म्हणजे पिंपळाचे झाड मुळासकट तोडून त्याजागी शोभेचे विदेशी झाड लावण्यासारखे आहे. राज्यातील विविध शहरात आज कोट्यवधीची विकासकामे सुरू आहेत. परंतु ज्या भाषेने विकासाचा खरा अर्थ शिकविला त्या भाषेचाच विकास खुंटतो आहे हे नक्‍कीच दुर्दैवी आहे. अशी परिस्थिती केवळ नागपूर शहराचीच नाही, तर गेल्या काही वर्षांत राज्यात बंद पडणाऱ्या शाळांचा आकडा मराठी भाषेच्या शिक्षणाच्या भविष्याबाबत चिंता व्यक्‍त करणारा आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारी 2018 मध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारित असणाऱ्या तब्बल 1 हजार 300 मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शासकीय भाषेत हा बंद म्हणजेच शाळांचे स्थलांतरण होय. विद्यार्थी पट 0 ते 10 असल्याचे कारण पुढे ढकलून हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पालक, शिक्षक आणि सामाजिक संघटनांनी याविरोधात रान उठविल्यानंतर मात्र काहीशी मवाळ भूमिका घेण्यात आली. 1 हजार 300 चा आकडा सव्वापाचशेपर्यंत आणण्यात आला. मराठी शाळांची खालावणारी परिस्थिती पाहता शासनाकडून सातत्याने मोफत आणि दर्जेदार सोयीसुविधा देण्याचा प्रयत्नही केला. मात्र, इंग्रजी शाळांत पाल्याचे भविष्य पाहणाऱ्या पालकांवर कसलाही फरक पडला नाही. पालकांची बदललेली मानसिकताही मराठी शाळा आणि मराठी भाषेच्या मुळावर घाव घालणारी आहे.

कमी पटसंख्या वर्गावरील शिक्षकांचे समायोजन आणि शाळा बंद करण्याचा सरकारचा 2018चा निर्णय डोळ्यासमोर ठेवून प्राथमिक शिक्षकांनी घरोघरी जाऊन पालकांमध्ये मराठी शाळांविषयी जनजागृती केली होती. अगदी सोशल मीडियावरूनही पालकांना आवाहन केले होते; परंतु याचा काहीही फायदा झाला नाही. आज मराठी शाळांची संख्या इंग्रजी शाळांच्या चौपट असूनही विद्यार्थी संख्येत वाढ दिसत नाही. दिवसेंदिवस मराठी शाळांची विद्यार्थी संख्या कमी होत चालल्याचे दिसून येते. उलट इंग्रजी शाळांची संख्या कमी असूनही त्यांची वाढणारी विद्यार्थीसंख्या चक्रावून टाकणारी आहे. तसे पाहता गेल्या 12 ते 13 वर्षांत इंग्रजी शाळांच्या अट्टहासापायी दरवर्षी मराठी शाळांची संख्या कमी होत गेली आहे. मुळात मराठी शाळा काय, नाट्यगृहे काय, मराठी सिनेमागृहे काय हे दिवसेंदिवस मावळतीला लागल्याची चिन्हे दिसत आहेत. मुळात मराठी माणसाचे केवळ मिरविण्यापुरते मराठी प्रेम हे याला कारणीभूत आहे.

मध्यंतरी मराठीतील प्रसिद्ध नाट्य कलावंत व अभिनेते प्रशांत दामले यांनी यावर एक जळजळीत प्रतिक्रिया दिली होती. लंडन येथे एका नाटकाचा प्रयोग करायला गेले असता एका वृत्तपत्राला त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली होती. महाराष्ट्रातील मराठी शाळा बंद पडण्याला पालकच सर्वस्वी जबाबदार आहेत, असे मत त्यांनी व्यक्‍त केले होते. मराठी माणूस मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी आवश्‍यक संस्कार त्यांच्या मुलांना देत नसल्याची खंत त्यांनी व्यक्‍त केली होती. मुलांना कॉन्व्हेन्टमध्ये शिक्षण जरूर द्यावे; पण त्यांच्यात मराठी भाषेची आवडही जोपासली पाहिजे. मराठीतून संवादाची सवय लावली पाहिजे. मुलांना भाषेची आवड लावली पाहिजे. ही जबाबदारी पालकांची असते. त्यामुळे पालकांनी ठरवले तरच मराठी भाषेला चांगले दिवस येऊ शकतात, असेही ते म्हणाले होते.

अभिनेता सुबोध भावे आणि इतर अनेक मराठी अभिनेत्यांनीही मराठी भाषेकडे केले जाणारे दुर्लक्ष यावर चिंता व्यक्‍त केली होती. परंतु त्याचा फारसा फरक पडलेला अद्यापही जाणवत नाही.
मराठी बोलल्यावर लोक सामान्य समजून हसणार तर नाहीत ना याची बरेचदा लाज वाटते. तर आपण उद्या मराठीत संभाषण करण्याचा चुकून प्रयत्न केला तर ते समोरच्याला रुचेल ना? समजेल ना? याबाबत वाटणारी भीती. कारण आजकाल हाय प्रोफाईल संभाषण हे इंग्रजी आणि काही प्रमाणात हिंदीत केले जाते. थोडक्‍यात, बोलीभाषेचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मराठी भाषा, शाळा, साहित्य, कला यांना चांगले दिवस आणणे हे आपल्याच हाती आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.