पुणे महापालिकेचा वृक्ष लागवड सद्यस्थिती अहवाल आहे कुठे?

आगामी बैठकीत चर्चा करण्याची सदस्यांची मागणी

पुणे – वनमहोत्सवांतर्गत शहरात लागवड केलेल्या रोपांचा सद्यस्थिती अहवाल महापालिकेने अद्यापही सादर केलेला नाही. याबाबत महापालिकेच्या प्राधिकरण समिती सदस्यांकडून सातत्याने मागणी करूनही हा अहवाल सादर करण्यात आलेला नाही. प्राधिकरण समितीच्या आगामी बैठकीत या अहवालाबाबत चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी समिती सदस्यांकडून करण्यात आली आहे.

राज्यशासनाच्या वनमहोत्सव उपक्रमांतर्गत गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनातर्फे राज्यात 13 कोटी वृक्ष लागवाडीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्याअंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड मोहीम घेण्यात आली होती. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण व उद्यान विभागाने पुणे महानगरपालिका क्षेत्रात सुमारे 75,000 वृक्ष लागवड करण्यात आल्याचे शासनाला कळवले. झाडांची संख्या त्यांचे स्थळ (अक्षांश व रेखांशांसहित) फोटो अशी सर्व माहिती वन विभागाला महापालिकेच्या मार्फत देण्यात आली. परंतु त्या झाडांची सद्यस्थिती तसेच त्यापैकी किती वृक्ष अस्तित्वात आहेत, याची कोणतीही माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही.

यंदा 33 कोटी वृक्ष लागवड उपक्रमांर्तगत पुणे महापालिकेने शहरात सुमारे दीड लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या वर्षी लावलेल्या वृक्षांच्या सद्यस्थितीचा अहवाल त्यांचे ठिकाण व संख्या याचा अहवाल वारंवार प्रशासनाकडे मागितला तरी तो मिळत नाही, पुढील होणाऱ्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा व्हावी व यासाठी हा विषय कार्यपत्रिकेत समाविष्ट करावा, अशी मागणी पत्राद्वारे आम्ही प्रशासनाकडे दि.9 एप्रिल रोजी केली होती. परंतु या मागणीला एक महिना उलटूनही अद्याप यावर चर्चा झालेली नाही. दरम्यान, गुरुवारी (दि.16) होणाऱ्या होणाऱ्या बैठकीच्या कार्यपत्रिकेत हा विषय जाणीवपूर्वक घेण्यात आलेला नाही. अशासकीय संस्थांचे प्रतिनिधींकडून वारंवार विचारणा होत असताना देखील प्रशासन हा अहवाल प्रसिद्ध करत नाही. सभासदांनी पत्राद्वारे मागणी करुन देखील त्यांनी हा विषय कार्यपत्रिकेत घेतला नाही, अशी तक्रार समितेचे सदस्य मनोज पाचपुते यांनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.