लस मुरतेय कोठे?; ‘वेस्टेज’बाबत आरोग्यमंत्र्यांचा ‘टोचण्या’

पुणे – शहरात मोठ्या प्रमाणात लस “वेस्टेज’ कशी होते, असा प्रश्‍न आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विचारला असून, त्याचा शोध घ्या असे आदेशही त्यांनी आयुक्तांना दिले आहेत.

करोना लसीकरणात लस वाया जाण्याचे प्रमाण एकूण दहा टक्‍क्‍यांपर्यंत असून, पुण्यात सर्वाधिक लस “वेस्टेज’ होत आहेत. यावर सोमवारी टोपेंबरोबर झालेल्या बैठकीत चर्चाही झाली. लसीच्या एका व्हायलमध्ये सुमारे दहा जणांना लस देता येते. मात्र, त्यातील शेवटी थोडे लिक्विड शिल्लक राहतेच.

याशिवाय एखादी व्हायल उघडली आणि ती पूर्ण वापरता आली नाही; तरी त्यातील लिक्विड शिल्लक राहते आणि ते पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा वापरता येत नाही. त्यामुळे तसे वेस्टेजही होते. याशिवाय खासगी रुग्णालयांनाही लस दिली जाते, तेव्हा तेथेही वेस्टेज गृहित धरूनच त्यांना दिले जाते. त्यामुळे तेथेही काहीप्रमाणात “वेस्टेज’ होऊ शकते.

त्यानुसार राज्यात लस वाटप करताना एकूण 10 टक्के “वेस्टेज’ धरण्यात आले आहे. मात्र, पुण्यामध्ये जेवढी लस दिली जाते त्यात “वेस्टेज’चे प्रमाण 8 टक्के असल्याचे उघड झाले आहे. नेमके डोस कुठे आणि कसे वाया जातात, याविषयी माहिती घेताना खासगी रुग्णालयांकडील तपशील मागवण्यात आला. त्यामध्ये त्यांना दिलेले डोस आणि त्यांनी लाभार्थींना टोचलेले डोस यांची माहिती घेण्यात आली.

त्यामध्ये पुरवलेले डोस आणि टोचलेले डोस यामध्ये फारशी तफावत दिसली नसल्याचे आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेकडून त्यांच्या केंद्रांवर दिल्या जाणाऱ्या लसींबाबत पाहणी करावी लागणार आहे. त्या विभागातही दोन अधिकाऱ्यांच्या भांडणामुळे लसींबाबत एकत्रित माहिती मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे आता “वेस्टेज’ कसे आणि कुठे होते आणि “लस नेमकी मुरतेय कोठे’ याचा शोध घ्यावा लागणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.