मुंबई – कराची स्थित कुविख्यात डॉन दाऊन इब्राहिम याने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच पाकिस्तानी पठाण महिलेशी दुसरा विवाह केला आहे अशी माहिती दाऊदची बहिण हसिना पारकर हिचा मुलगा अलीशाह पारकर याने राष्ट्रीय तपास यंत्रणेला दिली आहे. दाऊदचा पहिला विवाह मैजबिन हिच्याशी झाला आहे. आपण तिला घटस्फोट दिला असल्याचे सांगून त्याने पाकिस्तानी पठाण महिलेशी लग्न केले आहे असे अलीशाह पारकर याने म्हटले आहे.
दाऊद सध्या कराचीतील डिफेन्स कॉलनीत अब्दुल्ला गाजी बाबा दर्ग्याच्या मागे राहतो अशी माहितीही त्याने एनआयएला दिली आहे. तेथे त्याच्या बरोबर अनिस इब्राहिम आणि मुमताज रहीम फकी हे लोक राहतात. दाऊदची पहिली पत्नी व्हॉट्सऍप कॉलद्वारे लोकांशी संपर्क साधते असेही त्याने म्हटले आहे.
एनआयएने टेरर फंडिंग प्रकरणात अलीशाहची चौकशी केली आहे. या संबंधात दाखल केलेल्या आरोपपत्रात, एनआयएने त्याने दिलेली माहिती सादर केली आहे. अलीशाहच्या वक्तव्यानुसार दाऊदला चार भाऊ आणि चार बहिणी आहेत.अलीशाह याने काही महिन्यांपूर्वी दाऊद इब्राहिमची पहिली पत्नी मैजबीन हिची जुलै 2022 मध्ये दुबईत भेट घेतली होती.
ती आपल्या सर्व नातेवाईकांशी व्हॉट्सऍप कॉलद्वारे संपर्कात असते. मैजबीन हिला दाऊद पासून तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. मुलींपैकी एकीचे नाव मारुख (क्रिकेटपटू जावेद मियांदादचा मुलगा जुनैदशी विवाहित), दुसरीचे नाव मेहरीन, तर तिसरीचे नाव माझिया (अविवाहित) आणि मुलाचे नाव मोहिन नवाज आहे अशी माहितीही अलीशाह याने एनआयएला दिली आहे.