बंगळुरू : ईडीने मनी लॉण्डरिंगचा गुन्हा दाखल केल्याविषयी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका जमिनीच्या भरपाईपोटी दुसरीकडे जागा देण्यात आली. त्यामध्ये मनी लॉण्डरिंगचा संबंध येतोच कुठे, असा सवाल त्यांनी केला.
मैसुरू शहर विकास प्राधिकरणाच्या (मुडा) जमीन वाटपात घोटाळा झाला. त्याचा लाभ सिद्धरामय्या यांच्या पत्नी आणि इतर निकटवर्तीयांना मिळाल्याचा आरोप आहे. त्यावरून ईडीने मनी लॉण्डरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) सिद्धरामय्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने राजीनामा देण्याची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली. कर्तव्याची जाणीव ठेऊन मी जागरूकपणे कार्य करतो. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे सिद्धरामय्या पत्रकारांशी बोलताना म्हणाले.