नवी दिल्ली, दि. 4 – काही राजकारणी लोक रेमडेसिविर औषधांची टंचाई असतानाही या औषधांचा साठा वाटपासाठी कोठून मिळवतात याची चौकशी करण्याचा आदेशच आज दिल्ली हायकोर्टाने पोलिसांना दिला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा शोध लावावा त्यानंतरच आम्ही या विषयीच्या सीबीआय चौकशीच्या मागणीवर विचार करू असेही कोर्टाने म्हटले आहे.
राजकारण्यांना रेमडिसिविर कोठून मिळतात याची चौकशी करण्याची मागणी करणारी एक याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. त्यावरील सुनावणीच्यावेळी हायकोर्टाने हा आदेश दिला, तसेच याचिकाकर्त्याला या प्रकरणी प्रथम दिल्लीच्या पोलीस आयुक्तांकडे जाऊन तक्रार करण्याची सूचनाही केली. या साऱ्या प्रकरणात काही गैरव्यवहार आढळला तर पोलिसांनी संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्याची सुचनाही हायकोर्टाने केली आहे.
या संबंधातील अहवाल एक आठवड्याच्या आत सादर करण्याची सूचनाही कोर्टाने दिल्ली पोलिसांना केली असून या याचिकेवरील पुढील सुनावणी आता 17 मे रोजी ठेवण्यात आली आहे. एका स्थानिक स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख दीपक सिंह यांनी ही याचिका दाखल केली आहे. राजकारण्यांकडे कोणतेही औषध विक्रीचे अधिकार किंवा परवाना नसताना त्यांना हा साठा मिळतोच कसा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
या औषधांचा काळाबाजार करणाऱ्या राजकारण्यांवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.