मुंबई : बांगलादेशचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आहे. त्यासाठी बीसीसीआयने त्यांना पायघड्या घातल्या आहेत. हिंदूंवर बांगलादेशात अन्याय होत असताना त्यांच्या क्रिकेट संघाला भारतात येऊ देण्याच्या निर्णयामागे कोणाचा दबाव आहे? कुठे गेले तुमचे हिंदुत्व?, असे सवाल करत आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारसह बीसीसीआयवर टीका केली.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार आणि बीसीसीआयवर हल्लाबोल केला आहे. तसेच बांगलादेश आणि टीम इंडिया कसोटी मालिकेवरून आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारला काही सवाल केले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी बांगलादेशमध्ये हिंदुंवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्याच मुद्यांवरून आदित्य ठाकरे यांनी सरकारला घेरले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, बांगलादेशचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आहे. त्यासाठी ‘बीसीसीआय’ने त्यांना पायघड्या घातल्या आहेत. आता मी पराराष्ट्र मंत्रालयाकडून जाणून घेण्यास उत्सुक आहे की, काही माध्यमं आणि सोशल मीडियात सातत्याने सांगितलं जात असल्याप्रमाणे गेल्या २ महिन्यात बांगलादेशातील हिंदूवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या खऱ्या आहेत का?, जर खऱ्या असतील तर हिंदूंवर बांगलादेशात अन्याय होत असताना त्यांच्या क्रिकेट संघाला भारतात येऊ देण्याच्या निर्णयामागे केंद्र सरकारवर कोणाचा दबाव आहे? आणि जर या बातम्या खोट्या असतील तर, सोशल मीडियातून आणि माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या या बातम्या (बांगलादेशात हिंदू समाजावर अत्याचार!) हा भाजपाने भारतातल्या निवडणुका जिंकण्यासाठी आणि समाजात तेढ निर्माण करण्यासाठी निर्माण केलेला ‘जुमला’ तर नाही ना? हिंदूवर जर बांगलादेशात खरंच अत्याचार होत असतील, तर भाजपा प्रणित केंद्र सरकार त्यांच्या क्रिकेट संघाला पायघड्या का घातल्या, असे प्रश्न आदित्य ठाकरे उपस्थित केले.