पुणे – करोनासदृश लक्षणे दिसल्याबरोबर, “आरटी-पीसीआर’ टेस्ट करण्याआधी खबरदारी म्हणून “सेल्फ टेस्टिंग किट’चा वापर करण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सुचवले होते. किंबहुना त्याच अनुषंगाने हे “किट’ बाजारात खुल्या पद्धतीने विक्री करण्याला परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर दि. 1 जानेवारीपासून सव्वादोन लाख “किट’ ची विक्री झालीही. परंतु, सेल्फ टेस्टिंग केलेल्या किती जणांनी “टेस्ट रिपोर्ट’ “आयसीएमआर’कडे पाठवले जातात, हा मोठा प्रश्न महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागालाही पडला आहे.
करोना सदृश लक्षणे दिसल्यास, घरातील अन्य सदस्यांनाही त्याची लागण झाली आहे का, हे पाहण्यासाठी खबरदारी म्हणून “सेल्फ टेस्टिंग किट’द्वारा घरच्या घरी तात्पुरती टेस्ट करता येते. हे किट बाजारातून घेऊन येताना संबंधित केमिस्टकडे नाव नोंदणी आणि आधार कार्ड आदी ओळखपत्र देणे “अन्न आणि औषध प्रशासना’ने बंधनकारक केले होते. दुकानदारानेही ही माहिती घेणे बंधनकारक केले होते. मात्र, यापैकी काहीही प्रक्रिया झालीच नसल्याची माहिती पुढे आली आहे.
“सेल्फ टेस्टिंग किट’ वापरानंतर त्यात पॉझिटिव्ह आढळलेल्यांची माहिती महापालिकेकडे नाही. ती कोणत्याही यंत्रणेतून कळवण्यात आली नाही. रॅपिड अँटिजेन आणि महापालिकेच्या, खासगी आरटी-पीसीआर सेंटर्समध्ये जी तपासणी होते, त्याचीच माहिती प्रशासनाला मिळते. त्यामुळे “सेल्फ टेस्टिंग किट’ मधून पॉझिटिव्ह आलेले लोक जर क्वारंटाइन न होता रस्त्यांवर फिरत राहिले तर ते जास्त सुपर स्प्रेडर ठरू शकतात. त्यांनी “किट’ मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
– डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, मनपा
या किटची विक्री केल्यानंतर नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून त्याची माहिती ऍपवर भरणे बंधनकारक आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. हा नागरिकांच्या वैयक्तिक शिस्त आणि जबाबदारीचा विषय आहे. टेस्टचा जो “पॉझिटिव्ह’ किंवा “निगेटिव्ह’ रिपोर्ट असेल तो त्यांनी सरकारी यंत्रणांना कळवणेही बंधनकारक आहे.
– एस. व्ही. प्रतापवार, सहआयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन