भारत आणि पाकिस्तानचे स्पर्धक जेव्हा एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात

पालेमबंग – स्पर्धा म्हटली की प्रतिस्पर्धी खेळाडू एकमेकांविरुद्ध उभे ठाकतात. त्यात भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू आणि पाठीराखे तर मैदानातच नव्हे, तर बाहेरही एकमेकांच्या विरोधात असतात. मात्र जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत अगदी उलट चित्र पाहायला मिळाले. भारताची रोहन बोपण्णा आणि दिविज शरण ही जोडी पुरुष दुहेरी सुवर्णपदकाच्या लढतीत कझाखस्तानच्या जोडीचा सामना करत असताना पाकिस्तानचे खेळाडू भारताच्या विजयासाठी चिअरिंग करताना दिसले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नाते जगजाहीर आहे. त्यामुळे हे सख्खे शेजारी कोठेही भेटले की तणावाचे वातावरण निर्माण झालेच म्हणून समजा. पण, टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जेव्हा भारताचा सामना कझाकिस्तानविरुद्ध होता, तेव्हा पाकिस्तानच्या टेनिस संघातील खेळाडू मैदानात उपस्थित होते आणि त्यांनी चक्‍क भारतीय जोडीला पाठिंबा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्या या कृत्याचे सगळीकडेच कौतुक लागले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्या खेळाडूंनी या स्पर्धेच्या उद्‌घाटन समारंभात एकत्र संचलन करून जगाला शांततेचा संदेश दिला. तर काही स्पर्धांमध्ये या दोन्ही देशांचे खेळाडूंनी एकत्र सहभागही नोंदवला. त्यातच टेनिस पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपण्णा-दिविज शरण जोडीनं कझाकिस्तानच्या कझाकिस्तानच्या एलेक्‍झांडर बुबलिक आणि डेनिस येअसेयेव या जोडीवर 6-3, 6-4 अशी सरळ सेटमध्ये मात करून सुवर्णपदकावर नाव कोरले. भारताचे हे सहावे सुवर्णपदक ठरले. या लढतीत पाकिस्तानचे खेळाडू बोपण्णा व शरण यांच्या बाजूने उभे होते. त्यामुळे या घटनेकडे सर्वजण कौतुकाने पाहात आहेत.

बोपण्णाने 2010 मध्ये पाकिस्तानच्या ऐसाम-उल-हक-कुरेशी याच्यासोबत अमेरिकन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. बोपण्णा आणि कुरेशी या जोडीला “पीस एक्‍सप्रेस’ म्हणून संबोधले जात असे. त्यामुळेही पाक खेळाडू आणि क्रीडाशौकिनांना बोपण्णाबद्दल “सॉफ्ट कॉर्नर’ असल्याचे दिसून आले आहे. आता आशियाई स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंनी घेतलेल्या पुढाकाराचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

नेमबाजी स्पर्धेतील पाकचे खेळाडूदेखील भारताचे खेळाडू अथवा प्रशिक्षक यांच्यासोबत चर्चा करत असतात. तसेच खेळात कशा प्रकारे सुधारणा करता येईल याबद्दल ते नेहमीच प्रयत्न करताना दिसून येतात अशी माहिती यावेळी पाकिस्तानच्या संघातील एका सदस्याने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)