दिव्यांगांसाठी रेल्वे कधी होणार “सुगम्य’?

आयुक्‍तालयाने रेल्वे प्रशासनाला सुचविले बदल

पुणे – दिव्यांग व्यक्‍तींचा रेल्वे प्रवास सुलभपणे व्हावा, यासाठी रेल्वे स्थानक, गाडीतील शौचालय आणि अन्य बाबींमध्ये आवश्‍यक बदल होण्याची गरज आहे. यासाठी राज्याच्या दिव्यांग आयुक्‍त कार्यालयाने उपाययोजना सुचविल्या आहेत. अपंग कल्याण कार्यालय आयुक्‍त प्रेरणा देशभ्रतार यांनी रेल्वेच्या वरिष्ठ पातळीवर याबाबत पत्रव्यवहार केला आहे.

दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने दि.28 डिसेंबर 2016 रोजी “दिव्यांग व्यक्‍ती कायदा’ मंजूर केला आहे. त्यानुसार या घटकाला समान अधिकार दिले असून, विविध सोयी-सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, दैनंदिन जीवनात या घटकाला अनेक बाबी हाताळण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामध्ये रेल्वे प्रवसाचादेखील समावेश आहे. सुदृढ व्यक्‍तीला डोळ्यांसमोर ठेवून रेल्वेगाडी आणि स्थानकांची निर्मिती करण्यात आली आहे. तर दिव्यांग व्यक्‍ती कायद्यामुळे रेल्वे स्थानकावर आता रॅम्प दिसत आहेत. केवळ एवढ्याच बाबी दिव्यांगांना पुरेशा नसल्याची बाब आयुक्‍तालयाने समोर आणली आहे.

रेल्वे प्रवासात दिव्यांगांसाठी बोगी अथवा काही आसने राखीव असतात. तरीदेखील त्यामधील शौचालयाचा वापर दिव्यांग व्यक्‍तींना शक्‍य होत नाही. त्यामुळे या शौचालयाच्या रचनेत बदल करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. याशिवाय या घटकाच्या वाहनांकरिता स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नसल्याने अन्य वाहनचालकांकडून त्रास सहन होतो. मागील वाहन चालक हॉर्न वाजवत असल्याने अन्य प्रवाशांचे याकडे लक्ष वेधले जाते. त्यामुळे दिव्यांगांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्याचे सुचवले आहे.

या दोन्ही बाबींबरोबरच रेल्वे स्थानकावर आलेल्या दिव्यांग व्यक्‍तीला उंचीवरील खिडकीतून प्रवासाचे तिकीट काढण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. तिकीट मशीनचीदेखील उंची अधिक असल्याने या व्यक्‍तींना ही साधने सुलभपणे हाताळता येत नाहीत. या साधनांमध्ये आवश्‍यक बदल करण्याचे आयुक्‍तालयाने प्रशासनाला सुचविले आहे.

सुदृढ व्यक्‍ती डोळ्यांसमोर ठेवून, रेल्वेस्थानक व रेल्वे डब्यांची बांधणी करण्यात आली आहे. मात्र, समाजाचा एक घटक असलेल्या दिव्यांग व्यक्‍तींनादेखील समान अधिकार असूनही, त्यांना रेल्वे प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या घटकाला होणाऱ्या अडचणी आम्ही पत्रव्यवहाराच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.
– संजय कदम, उपायुक्‍त, अपंग कल्याण आयुक्‍त कार्यालय, पुणे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.