क्रिकेट काॅर्नर : जबाबदारीची जाणीव कधी येणार?

– अमित डोंगरे

इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्याला आजपासून प्रारंभ होत आहे. लॉर्ड्‌सवरचा विजय मानसिकता उंचावणारा ठरेल असे वाटत असतानाच तेजोभंग करणारा पराभव भारतीय संघाने हेडिंग्लेवर स्वीकारला. या सामन्यात एखाद्या खेळाडूने नव्हे तर संपूर्ण संघाने आपली जबाबदारी ओळखून खेळ करणे गरजेचे आहे.

भारतीय संघ अनेकदा एखाद्या सामन्यात अत्यंत सुस्थितीत असताना पराभूत झाला आहे. हे चित्र भारतीय संघाच्या बाबतीत पहिल्यापासूनच दिसलेले आहे. साल कोणतेही असो, कर्णधार कोणीही असो, संघात कोणतेही दिग्गज खेळाडू असोत. चांगल्या अवस्थेतूनही पराभूत होण्याची किमया केवळ भारतीय संघच करू शकतो, असेच आता उपहासाने म्हणावे लागत आहे.

नॉटिंगहॅमच्या कसोटीत जिंकण्यासाठी दीडशेच्या आसपास धावा हव्या असताना पावसाने हा विजय हिरावून घेतला. त्यानंतर फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रात अफलातून कामगिरी करत भारतीय संघाने लॉर्ड्‌स कसोटी जिंकली व मालिकेत आघाडीही घेतली. मात्र, त्यानंतर हेडिंग्ले कसोटीत याच तीनही क्षेत्रात कमालीची सुमार कामगिरी करत भारताने पराभव स्वीकारला. इतके बेभरवशाचे खेळाडू जागतिक क्रिकेटमध्ये अन्य कोणत्याही देशाच्या संघात नसतील.

इंग्लंडची फलंदाजी कर्णधार ज्यो रूट या एकट्यावर अवलंबून आहे आणि गोलंदाजी एकट्या जेम्स अंडरसनवर अवलंबून आहे. मात्र, भारतीय खेळाडूंची बेजबाबदार वृत्ती त्यांच्या क्‍लब दर्जाच्या गोलंदाजीलाही जागतिक कीर्ती हस्तांतरित करत आहे. आजच्या घडीची जागतिक क्रिकेटमधील सर्वात बलाढ्य फलंदाजी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना पाहावत नाही व त्यामुळेच हल्ली भारतीय फलंदाजांच्या बाद होण्याचा राग येत नाही तर कीव येते.

आता ही मालिका व तिची कक्षा आणखी रुंदावली आहे. या चौथ्या कसोटीतील विजयासह मालिका सुरक्षित करत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील राहणार हे तर उघड आहे, पण त्यातही भारतीय संघातील सर्व खेळाडू जबाबदारी ओळखून खेळतील का, हाच काय तो प्रश्‍न आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.