चार महिने झाल्यानंतरही प्रतीक्षा कायम
पिंपरी – उद्घाटन होऊन जवळपास चार महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही अद्याप पिंपरीतील नव्या जागेत फुलबाजार सुरू झालेला नाही. संबंधित जागेत पाणी, वीजपुरवठा आदी प्रमुख सुविधा मिळाव्यात, अशी फुलविक्रेत्यांची मागणी होती. त्यासाठी हा फुलबाजार सुरू झालेला नव्हता. दरम्यान, आता हा फुलबाजार लवकरात लवकर सुरू हवा, अशी नागरिकांची मागणी आहे.
महापालिकेच्या वतीने पिंपरीतील क्रोमा शोरूमच्या शेजारी फुलबाजारासाठी 27 गाळे निर्माण केले आहेत. प्रत्येक गाळ्याचे क्षेत्र सरासरी 80 ते 90 चौरस फूट इतके आहे. संबंधित फुलबाजाराचे उद्घाटन तत्कालीन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते नोव्हेंबर 2019 मध्ये झाले. चार महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही अद्याप संबंधित जागेत फुलबाजार सुरू झालेला नाही.
पिंपरीतील शगुन चौकाजवळ सध्या रस्त्यावरच फुलबाजार भरतो. खेड व मावळ तालुक्याबरोबरच शहरातील मोशी, चऱ्होली, डुडुळगाव आदी ठिकाणचे फूलउत्पादक शेतकरी याच बाजारात विक्रीसाठी फुले आणतात. त्यांना फुलबाजारासाठी सध्या पुरेशी जागा नसल्याने त्यांची गैरसोय होते. त्यामुळे त्यासाठी स्वतंत्र जागा अथवा गाळे उपलब्ध करून देण्याची फुलविक्रेत्यांची मागणी होती. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ सदस्यांनी तत्कालीन महापौर काळजे यांची भेट घेऊन याबाबत 2018 मध्ये मागणी केली होती. त्यानुसार फुलबाजारासाठी तात्पुरत्या स्वरूपात पत्र्याचे गाळे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
महापालिकेच्या वतीने पिंपरीत प्रस्तावित असलेल्या नवीन जागेत फूलबाजार सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधांची मागणी महापालिकेकडे केली होती. त्यांच्याकडून पाणीपुरवठा आणि विजेची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, समोरील बाजूला स्वच्छतागृहदेखील आहे. फुलविक्रेत्यांना पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून गाळे वाटपाबाबतचे पत्र अद्याप मिळणे बाकी आहे. संबंधित पत्र मिळाल्यानंतर लवकरच येथील जागेत फुलबाजार सुरू होईल.
– राजकुमार मोरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड फुलबाजार आडते संघ.