पुणे – चीनमध्ये उगम पावलेल्या कोरोना विषाणूने आता संपूर्ण जगाला ग्रासले आहे. अतिशय संसर्गजन्य असलेल्या या कोव्हीड – १९ महासाथीची बाधा जगाच्या पाठीवरील १ कोटीहून अधिक लोकांना झाली असून यामुळे लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या या कोरोना विषाणूवर कधी एकदाची लस येते आणि आपण पुन्हा एकदा स्वछंदी जीवन जगू शकू असा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे. मात्र कोरोना इतक्यात काही आपली पाठ सोडत नाही असंच चित्र निर्माण झाल्याचं दिसतंय.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज एका कार्यक्रमादरम्यान बोलताना सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी कोरोना विषाणूवर लस कधी येणार? या प्रश्नाला उत्तर दिलं. ते म्हणाले, “कोरोनाची लस यायला अजून किमान सहा महिने लागतील. या वर्षीच्या शेवटपर्यंत लस येणं अपेक्षित आहे.” सिरमने ऑक्सफर्डसोबत कोरोना लस निर्मिती संदर्भात करार केला असून या लसीच्या सध्या मानवी चाचण्या सुरु आहेत.
दरम्यान, यावेळी बोलताना पुनावाला यांनी, लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल हाती लागल्यानंतर लस नेमकी कधीपर्यंत येईल याबाबत आपण बोलू शकू असंही ते म्हणाले.
माय लॅबतर्फे आरटी पीसीआर टेस्ट मशीन लॉन्च पुण्यातील मायलॅबतर्फे आज आरटी पीसीआर टेस्ट करण्यासाठीचे एक नवे मशीन सादर करण्यात आले. कोरोना चाचणी करण्यासाठी आरटी पीसीआर टेस्ट सगळ्यात उपयुक्त मानली जाते. या नव्या मशीनच्या सादरीकरणाच्या कार्यक्रमात अदर पुनावाला बोलत होते.
सुरक्षित आणि प्रभावी लस देणं हेच उद्दिष्ट सीरम इन्स्टिट्यूटतर्फे मायलॅब कंपनीमध्येही गुंतवणूक करण्यात आली आहे. पुढे बोलताना अदर पुनावाला म्हणाले की, “नुकतीच एक बातमी आली होती की, लस बनवण्यासाठी एका कंपनीला घाई करण्यात आली. आम्हाला अशी घाई नाही. सुरक्षित आणि प्रभावी लस देणं हेच आमचं उद्दिष्ट आहे.”