पुणे – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर आर्थिक शिस्त पाळली, तर लाडक्या बहिणींना दरमहिना तीन हजार रुपये देखील देता येऊ शकतात, हे दाखवून देऊ, असे कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी सांगितले.
महाविकास आघाडीच्या पुणे शहरातील उमेदवारांच्या प्रचारासाठी थोरात पुण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात महालक्ष्मी योजनेतंर्गत महिला तीन हजार रुपये प्रतिमहिना देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यावर महायुतीचे नेते अजित पवार यांनी टीका करताना हा पैसा कोठून आणणार, अशी विचार केली होती.
त्याबाबत थोरात यांना विचारले असता, ते म्हणाले, की महायुतीने राज्यातील आर्थिक शिस्त बिघडवली आहे. त्याला शिस्त लावली, तर हे शक्य आहे. राज्याचे आर्थिक उत्पन्न चांगले आहे. तुम्ही अर्थव्यवस्था कशी चालवता, त्यावर हे अवलंबून आहे. त्यामुळे हे सत्तेत आल्यानंतर करून दाखवून देऊ.
भाजपने अडीच वर्षांत केलेले फोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्रातील जनतेला आवडलेले नाही. महाविकास आघाडीत सत्तेवर आल्यानंतर नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत त्यांच्यावर ईडीच्या माध्यमातून चौकशा लावल्या. ज्यांच्यावर आरोप केले, त्यांनाच आज पक्षात घेऊन ते सत्तेत बसले.
सर्व चौकशा व फाइल बंद झाल्या. पक्षांतरबंदीचा कायदा भाजपने मोडीत काढला, अशा शब्दांत थोरात यांनी महायुतीवर टीका केली. राज्यात महाविकास आघाडीच्या १८० पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचा प्रयत्न आहे. आघाडीची सत्ता राज्यात येणार आहे. महायुतीने रखडविलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहा महिन्यांत घेऊ, असेही ते म्हणाले.
बंडखोरांमागे भाजपाचा हात
महायुतीतील बंडखोरी शमविण्यात भाजपला यश आले; परंतु महाविकास आघाडीला का यश आले नाही, असे विचारले असता, थोरात म्हणाले, की, राज्यातील महाविकास आघाडीतील बंडखोर उमेदवारांमागे भाजपचा हात असण्याची शक्यता आहे. कारण सत्तेसाठी भाजप कोणत्याही आणि कितीही साधनांचा वापर करू शकतो, हे यापूर्वी आपण पाहिले आहे. त्यामुळे हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो.