विद्यार्थी संघटनांचा सवाल : जिल्हा प्रशासनाला निवेदन
पुणे – खासगी क्लासेसच्या मनमानी कारभारावर अजूनही काहीच कारवाई होताना दिसत नाही. खासगी क्लासेसमधील शिक्षकांकडून लैंगिक अत्याचाराच्या घडना यापूर्वी समोर आल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर खासगी कोचिंग क्लासेसवर निर्बंध आणावेत, अशी मागणी विद्यार्थी संघटनांतून होत आहे.
काही महिन्यांपूर्वी गुजरातच्या सुरत येथे खासगी कोचिंग क्लासेसच्या इमारतीला लागलेल्या आगीत 17 विद्यार्थ्यांचा होरपळून मूत्यू झाला. त्यानंतर खासगी कोचिंग क्लासेसच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या घटनेनंतरही क्लासेसमध्ये अजूनही एका वर्गात 100 ते 150 विद्यार्थी बसविले जातात. त्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत एखादी आगीची अथवा दुर्दैवी घटना घडली तर मोठी जीवित हानी होण्याची शक्यता आहे. या विषयावर जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे) या संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कनोजिया यांनी आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केली.
जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि शिक्षण विभागाकडून खासगी क्लासेसची तपासणी व्हावी. तेथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तपासण्यात यावी. तसेच अनेक क्लासेसमध्ये शौचालयाची व्यवस्था नाही. विद्यार्थी सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मनमानी सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासेसवर जिल्हा प्रशासनाने निर्बंध घालावेत, असेही संघटनेने म्हटले आहे.
दरम्यान, ही बाब गंभीर असून, त्यावर तातडीने प्रशासनाकडून पावले उचलले जातील. याबाबत संबंधितांची लवकरच बैठक बोलावून त्याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर ठोस निर्णय घेण्यात येतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटल्याचे कनोजिया यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे शैलेश विटकर, रवींद्र बनसोडे, रुपेश घोलप उपस्थित होते.