सातारा मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश कधी?

“नीट’परीक्षेनंतर चर्चा सुरू, जिल्ह्यात साडेपाच हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
सातारा (प्रतिनिधी)-
“नीट’ परीक्षेच्या निमित्ताने साताऱ्याच्या शासकीय मेडिकल कॉलेजची पुन्हा चर्चा सुरु झाली. साताऱ्यात मेडिकल कॉलेजची प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार, याची उत्सुकता आहे. मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रश्‍न मार्गी लागून लवकरच कामाला सुरवात होईल, असे सांगण्यात येत होते. परंतु, प्रत्यक्षात इथल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणायासाठी विद्यार्थ्यांना आणखी किती काळ वाट पाहवी लागणार, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

वैद्यकीय व दंतवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची “नीट’ परीक्षा रविवारी साताऱ्यात सुरळीतपणे पार पडली. “नीट’चा पेपर यंदा विद्यार्थ्यांना सोपा गेल्याने प्रवेशाचा कट ऑफ पंचवीस ते तीस टक्‍क्‍यांनी वाढण्याची शक्‍यता आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर झालेल्या “नीट’ परीक्षेसाठी साताऱ्यात 13 केंद्रांवर सोशल डिस्टन्सिंग पाळून साडेपाच हजार विद्यार्थी सहभागी झाले. पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य के. एन. सिंग यांच्याकडे जिल्हा समन्वयक म्हणून जवाबदारी देण्यात आली होती. महाराष्ट्रातून दोन लाख 28 हजार विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले.

फिजिक्‍स, केमेस्ट्री व बायोलॉजी या विषयांचे पेपर सोपे गेल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. यंदा करोनामुळे दोन वेळा लांबणीवर पडलेल्या परीक्षेसाठी सराव करण्यासाठी भरपूर वाव मिळाला व प्रश्‍न पत्रिका एनसीइआरटी अभ्यासक्रमावर आधारित होती. सोशल डिस्टन्सिंग, विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग या प्रक्रियेसाठी त्यांना दीड तास आधीच परीक्षा केंद्रावर बोलावण्यात आले होते. शहरातील 13 परीक्षा केंद्रांवर काटेकोर काळजी घेण्यात आली. करिअर ऍकडमीचे मंगेश बोरगावकर म्हणाले, “पेपर सोपे गेल्याने सरकारी महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय प्रवेशांचा कट ऑफ पंचवीस टक्‍क्‍यांनी वाढू शकतो. राज्य शासनाने सत्तर तीसचा कोटा यंदा रद्द केल्याने प्रवेश प्रक्रियेची चुरस तीव्र होणार आहे. कट ऑफ दहा ते पंधरा टक्‍क्‍यांनी वाढेल असे काही तज्ज्ञांनी स्पष्ट केले. या परीक्षेचा निकाल या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार आहे.

जागा उपलब्ध झाल्याने उभारणीला गती
“नीट’ परीक्षेच्या निमित्ताने साताऱ्याच्या शासकीय मेडिकल कॉलेजची पुन्हा चर्चा सुरु झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा विभागाची जागा उपलब्ध करून दिल्याने मेडिकल कॉलेजच्या उभारणीस गती मिळाली आहे. किमान पहिल्या टप्प्याची तयारी सुरु झाल्याची माहिती असून तांत्रिक प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. मेडिकल कॉलेजच्या आस्थापना व जागांचा कोटा निश्‍चित झाला असता तर यंदापासूनच साताऱ्यात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असती. मात्र, हे चित्र प्रत्यक्षात येण्यासाठी विद्यार्थ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.