मालकाने पाहताच चोरटे एलईडी टाकून पळाले

पिंपरी  – घराचे कुलुप तोडून घरातील एलईडी टिव्ही चोरुन नेणाऱ्या चोरट्यांना घरमालकानेच पाहिल्यांनतर चोरट्यांनी तेथेच एलईडी टाकून पळ काढला. ही घटना 26 मे रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पिंपरी येथील भाजी मंडई शेजारील सेनेटरी पत्र्याच्या चाळीमध्ये घडली. उल्लेखनीय बाब म्हणजे घरमालक चोरांना ओळखतात, सर्व चोरटे त्याच चाळीत राहणारे असल्यामुळे घरमालकाने चोरांच्या नावासह पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याप्रकरणी सनी ज्ञानू शिरसाठ (वय-34) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन, गणु रिंकू लोट (वय-27), लड्डु उर्फ हर्ष बहोत (वय-19), अक्षय उर्फ गबऱ्या सांगळे (वय-22), दिपक पप्पा खत्री (वय-19) सर्व रा. सेनेटरी पत्र्याची चाळ, पिंपरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सनी आपले घर बंद करुन बाहेर गेले होते. त्यानंतर पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास आरोपींनी त्यांच्या घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. चोरटे घरातील 70 हजार रुपये किंमतीचा एलईडी टिव्ही चोरुन नेत होते. तेवढ्यात फिर्यादी आपल्या घराजवळ आले आणि त्यांनी आरोपींना एलईडी चोरुन नेताना पाहिले. घरमालक आला असून त्याने आपल्याला पाहिले आहे, हे लक्षात येताच चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घरासमोरच एलईडी टिव्ही टाकून पळ काढला. सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर सनी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निमगिरे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.