-->

जेव्हा गर्दी जमते, तेव्हा सरकारेही बदलतातच; राकेश टिकैत यांचे कृषी मंत्र्यांना प्रत्युत्तर

सोनीपत  -जेव्हा गर्दी जमते; तेव्हा सरकारेही बदलतात, अशा शब्दांत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सोमवारी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना प्रत्युत्तर दिले. केंद्रीय कृषी कायदे मागे न घेतल्यास सत्तेत राहणे अवघड बनेल, असा इशाराही टिकैत यांनी मोदी सरकारला दिला.

तोमर यांनी रविवारी शेतकरी आंदोलकांशी चर्चा करण्यास सरकार तयार असल्याच्या भूमिकेचा पुनरूच्चार केला. कृषी कायद्यांमधील कुठल्या तरतुदी शेतकरीविरोधी आहेत; ते आंदोलकांनी सांगावे. केवळ गर्दी जमा झाल्याने कायदे रद्द होणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले. त्या वक्तव्याचा समाचार टिकैत यांनी हरियाणातील शेतकरी महापंचायतीत बोलताना घेतला.

आमचे आंदोलन केवळ शेतकऱ्यांपुरते मर्यादित नाही. गरीब, रोजंदारीवर काम करणारे मजूर आणि इतरांचेही ते आंदोलन आहे. कृषी कायदे मागे घेतले जाईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी पुन्हा बोलून दाखवला. कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता तीन महिन्यांचा कालावधी होत आला आहे. आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्यासाठी शेतकरी नेते विविध ठिकाणी महापंचायती घेत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.